जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाची चौकशी करणार
प्रतिनिधी/ बेळगाव
अलीकडच्या काळात पोलीस व अधिकाऱ्यांनी पत्रकारांना केलेली धक्काबुक्की व त्यांच्या वाहनांची तोडफोड करणे हे अनुचित प्रकार घडण्याचा खेद आहे. यापुढे पत्रकारांच्या बाबतीत असे प्रकार घडणार नाहीत, याची योग्य ती काळजी घेऊन त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले.
विधानपरिषदेत महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना अपशब्द वापरल्याने भाजप नेते सी. टी. रवी यांना अटक केल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार गेले होते. परंतु त्यांना वारंवार रोखण्यात आले. इतकेच नव्हे तर पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. खानापूर, रामदुर्ग व गोकाक तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांचा अवमान केला. तसेच त्यांच्या वाहनांचीही मोडतोड केली. याच्या निषेधार्थ पत्रकारांनी शनिवार दि. 21 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात धरणे धरले. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पत्रकारांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी पत्रकारांसमवेत बैठकीचे आयोजन केले. याप्रसंगी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद उपस्थित होते. बैठकीत पत्रकार दिलिप कुरुंदवाडे, मंजुनाथ पाटील, रमेश हिरेमठ, सहदेव माने, चंद्रू श्रीरामुलू, माहबूब मकानदार यांनी पत्रकारांना आलेल्या अडचणी सांगून अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिलेल्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व म्हणणे ऐकून घेत प्रशासन व माध्यमे यांनी परस्पर सहकार्याने काम करणे आवश्यक आहे. पत्रकारांना धक्काबुक्की व त्यांच्या वाहनांची मोडतोड प्रकरणाची सखोल चौकशी करू व दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी मनीषा सुभेदार, रवी उप्पार, राजू हिरेमठ, मैलारी पटात, नौशाद विजापूर, सुनील पाटील, संतोष चिनगुडी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.









