सरसंघचालक मोहन भागवत यांचा घणाघात, मिशनऱयांपेक्षा संतांचे काम सरस
जयपूर / वृत्तसंस्था
भारतात ख्रिस्ती मिशनऱयांपेक्षाही सरस आणि प्रभावी सामाजिक कार्य संतांकडून होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्थापनेपासूनच सेवाकार्यात मग्न आहे. सेवेची मानसिकता सर्वांमध्येच असते. केवळ तिला जागविण्याची आवश्यकता असते. आपल्या देशात काही विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत, की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी युद्ध छेडणाऱयांना गुन्हेगार ठरविले आहे. समाजाने अशा मानसिकतेपासून सावध रहावयास हवे. अशी मनोवृत्ती समाजासाठी घातक असते, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या ‘राष्ट्रीय सेवा संगम’ संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते भाषण करीत होते. अशा प्रकारचे हे देशातील तिसरे तर राजस्थानमधील प्रथम संमेलन आहे. या संमेलनात संघ परिवारातील संस्थांच्या सेवाकार्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
कोणीही मागास असू नये
हिंदू समाज बळकट करणे हे आमचे ध्येय आहे. आपल्या समाजात कोणीही घटक किंवा व्यक्ती मागास राहू नये. सर्वांना आपण आपल्या समान मानले पाहिजे. आपल्या समाजात कोणी मागे राहिलेला असेल तर ती आपल्यासाठी एक त्रुटी आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न आपण करावयास हवा. कमजोर लोकांना आपणच सामर्थ्य द्यावयास हवे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांविरोधात लढलेल्यांवर गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्यात आला. त्यांना पायाभूत सुविधाही नाकारण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतरही त्यांची अवस्था अशीच राहिली. संघाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर प्रथम संघाने त्यांच्यासाठी कार्य सुरु केले. आज संघाचे कार्य सर्व क्षेत्रांमध्ये पोहचले आहे, अशी भलावणही भागवत यांनी केली.
3 हजारांची उपस्थिती
या संमेलनात देशभरातून संघपरिवारातील आणि अन्यही सेवाभावी संस्थांचे 3 हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. गुरुवारी या संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला होता. त्या दिवशी विविध क्षेत्रांमधील सेवाकार्यांसंबंधीची माहिती देण्यासाठी एका प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले होते.
महनीयांची उपस्थिती
या संमेलनात उद्योगपती अजय पिरामल, सुभाष चंद्रा आदि महनीय व्यक्ती उपस्थित आहेत. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे, असे उद्गार अजय पिरामल यांनी काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी निःस्वार्थ भावनेने देशसेवा केली आहे. यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात संघाने अप्रतिम कार्य केले, जे सर्वांनी पाहिले. पिरामल न्यासाच्या वतीने देशभरात 100 स्थानी वनवासी समुदायांच्या उन्नतीसाठी कार्य सुरु आहे.
देशात ‘शंखनादा’पेक्षा अजान अधिक
आज देशात शंखनादापेक्षा अजानचा आवाजच अधिक ऐकू येतो, असे प्रतिपादन या कार्यक्रमात बोलताना बालयोगी उमेशनाथ महाराज यांनी केले. प्राचीन काळी घुसखोर भारतात आले. त्यांना देशभक्तांनी हरविले. मात्र, सध्याच्या काळात आपल्या देशातीलच काहीजण देशाशी द्रोह करीत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी सामाजिक समरसतेचे एक मोठे आंदोलन सुरु करण्यात आले, जे आज देशव्यापी बनले आहे, अशीही टिप्पणी उमेशनाथ महाराज यांनी केली.
संघाचे सेवाकार्य व्यापक
ड कोरोना काळात संघाने केलेल्या कार्याचे पिरामल यांच्याकडून कौतुक
ड आपल्यातील मागे राहिलेल्यांना सामर्थ्य देणे हेच आमचे प्रमुख कार्य









