स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना विविध सुविधा पुरवण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित करा, स्वतंत्र्य सैनिक कुटुंबातील वारसांना मासिक मानधन द्या, कुटुंबीयांच्या वारसांना ओळखपत्र द्या, स्वातंत्र्य सैनिक कुटुंबीयांच्या मुला-मुलींना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण द्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना मोफत बसप्रवास द्या, कुटुंबीयांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करा, स्वातंत्र्य सैनिकांच्या अंत्यविधीसाठी देण्यात येणारा शासकीय निधी वाढवून द्या, आदी मागण्यांसाठी अखिल कर्नाटक स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघातर्फे विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्य सैनिक घोषित करा, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना मासिक मानधन द्या, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. शक्ती योजनेबरोबर स्वातंत्र्य सैनिकांच्या मुला-मुलींना बसप्रवास मोफत देण्यात यावा, पंजाब राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धर्तीवर राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, अशी मागणीही स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.









