उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्ण विधानसौधसमोर होणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिकांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविल्याची माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
शनिवार दि. 18 रोजी सकाळी एआयसीसीचे सरचिटणीस रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सुवर्ण विधानसौधला भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पूर्णपणे हा सरकारी कार्यक्रम आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर फरीद, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर सहभागी आमदार व नेत्यांचा ग्रुप फोटो काढण्यात येणार आहे. त्यानंतर पाहुणे व निमंत्रितांना मुख्यमंत्र्यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे. राज्यातील आमदारांबरोबरच गंगाधरराव देशपांडे यांच्या कुटुंबासह प्रमुख कुटुंबांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पत्नी कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नाहीत…
मुडा घोटाळ्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सुरू असलेले हे एक राजकीय षड्यंत्र आहे. घोटाळा झाला आहे की नाही? न्यायव्यवस्थेला ठरवू द्या. ईडीची चौकशी कशी चालते, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे याविषयी जास्त काही बोलणार नाही. मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पत्नी कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नाहीत, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.









