जिल्ह्यातील शेवटच्या स्वातंत्र्यसैनिकाने बुधवारी घेतला अखेरचा श्वास
सांगली प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सांगलीभूषण माधवराव माने यांचे बुधवारी पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत तयार झालेले आणि वयाच्या शंभरीतही उत्साहाचा मूर्तीमंत झरा असणारे माधवराव माने यांच्या जाण्याने जिल्ह्यातील अखेरचा स्वातंत्र्यसैनिक हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र अनिल माने यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.
तत्पुर्वी त्यांच्या कुपवाड रोडवरील पार्श्वनाथनगर येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. माने यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा त्यांच्या कुपवाड रोडवरील घरापासून काढण्यात आली. त्यानंतर विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ पार्थिव आणण्यात आले, त्यावेळी त्याठिकाणी अमर रहे अमर रहे स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने अशा घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर हुतात्मा स्मारक, कामगार भवनमार्गे सांगलीत अमरधाम स्मशानभूमी येथे हे पार्थिव आणल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जितेश कदम, भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादीचे पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे बजरंग पाटील, मराठा सेवा संघाचे संजय पाटील, नितीन चव्हाण यांच्यासह राष्ट्रसेवा दलाच्या पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारस यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. शासनाच्या वतीने प्रांताधिकारी उत्तम दिघे, सांगलीच्या अप्पर तहसिलदार वरूटे, कुपवाडचे तलाठी किर्तीकुमार धस, सांगलीचे तलाठी विक्रम कांबळे उपस्थित होते.
माने यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अमरधाम स्मशानभूमी येथे माने यांना विविध मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली. त्यामध्ये अॅड. अजितराव सूर्यवंशी, जितेश कदम यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याचा समावेश होता.
आप्पा या नावाने सर्व परिचित माधवराव माने यांनी विद्यार्थीदशेत तासगाव हायस्कूलमध्ये राष्ट्रीय वृतीच्या शिक्षकांकडून राष्ट्रभक्तीचे शिक्षण घेतले. बालपणातच क्रांतिसिंह नाना पाटील यांना गुरु मानले. शालेय शिक्षण सोडून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधींनी सन 1942 मध्ये ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला आणि भारतीयांना करेंगे या मरेंगे असा निर्वाणीचा संदेश दिला. 3 सप्टेंबर 1942 रोजी तहसील कचेरीवर तिरंगा फडकाविण्याचा यशस्वी तासगाव मोर्चा त्यांनी जवळून अनुभवला. या मोर्चाप्रसंगी माधवरावांनी राष्ट्रसेवा दलातील मुलांकडून दोन छकडा भाकरी जमा करून सर्व लोकांना जेवू घातले. या संस्कारातून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूचे कफन डोक्याला बांधून त्यांच्या सोबतची बालसेना देश सेवेसाठी सज्ज झाली होती.