नागरिकांतून समाधान : नळ पाणीपुरवठा बंद असल्याने दिलासा
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने शासकीय निधीतून घरोघरी नळांना 24 तास पाणीपुरवठा योजना जलवाहिनीच्या खोदाईमुळे गेले तीन महिने सार्वजनिक नळांना पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याविना होणारी कुचंबणा लक्षात घेऊन ग्रा. पं. सदस्यांनी गेले दोन महिने टँकरने मोफत पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ला घरोघरी नळांना 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये सध्या पाईप घालण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. यामुळे गेले तीन महिने ऐन उन्हाळ्यात नळांना पाणी बंद आहे. यामध्ये खासकरून लक्ष्मी गल्ली व कलमेश्वर गल्लीतील नागरिकांना या भागातील विहिरींचे पाणीसुद्धा शेवाळ पाणी असल्यामुळे नळाच्या गोड्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. यामुळे या नागरिकांना गोड्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अन् ग्रा. पं. सदस्य अनिल पावशे सरसावले

पाईपलाईन खोदाई करणाऱ्या कंत्राटदाराकडून काम संथगतीने सुरू असल्यामुळे काम पूर्ण होण्यास बराच वेळ लागणार आहे. लक्ष्मी गल्ली व कलमेश्वर गल्लीतील नागरिकांना विहिरींच्या शेवाळ पाण्यामुळे दैनंदिन वापरासाठी हे पाणी योग्य नसल्यामुळे नळाच्या गोड्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. परंतु तीन महिन्यापासून पाणी बंद असल्याने ग्रा. पं. चा वेळकाढूपणा सुरू आहे. तेव्हा ही सारी बाब लक्षात घेऊन अनिल पावशे यांनी लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली व इतर ठिकाणी स्वत:च्या टँकरने मोफत पाणीपुरवठा करणे सुरू केले आणि ते दररोज टँकरने दोन महिने पाणीपुरवठा करत आहेत. तसेच नागरिकांना 24 तास घरोघरी पाणी मिळणारी योजनाही लवकरच सुरू होईल. नागरिकांनी संयम पाळून ग्रा. पं.ला सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.









