डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा : मध्यपूर्वेत विध्वंस घडवू
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीपूर्वी स्वत:ची आक्रमक भूमिका दाखविण्यास सुरुवात केली आहे. मी पदभार ग्रहण करेपर्यंत गाझापट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची मुक्तता करण्यात आली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी हमासला दिला आहे. वर्तमान अध्यक्ष जो बिडेन प्रशासनाच्या व्यापक कूटनीतिनंतर ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली आहे.
ओलिसांची 20 जानेवारीपूर्वी मुक्तता न झाल्यास मध्यपूर्वेत आणि या मानवी अत्याचारासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्व लोकांना अत्यंत मोठी शिक्षा केली जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या दीर्घ आणि ऐतिहासिक इतिहासात कधी कुणावर जितका हल्ला झाला नसेल त्याहून अधिक मोठा ओलिसांची मुक्तता न करणाऱ्यांवर केला जाणार आहे. ओलिसांची आताच मुक्तता करा असे ट्रम् यांनी हमासला उद्देशून म्ह्टले आहे. ट्रम्प यांनी इस्रायलसाठी कट्टर समर्थन आणि बिडेन यांच्यावर टीका करण्यापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे, परंतु जागतिक व्यासपीठावर अमेरिकेचे व्यवहार सुरक्षित करण्याची स्वत:ची इच्छाही व्यक्त केली आहे.
हमास-इस्रायल यांच्यात युद्ध
हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला केला होता, या हल्ल्यात 1208 लोकांना जीव गमवावा लागला होता, तर हमासने 200 हून अधिक ज्यू नागरिकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझामधून बाहेर पडावे असे म्हणत हमासने पॅलेस्टिनी कैद्यांच्या मुक्ततेची मागणी केली आहे. हमास पूर्णपणे नष्ट होत नाही तोवर युद्ध जारी राहणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासची मागणी धुडकावून लावत म्हटले आहे. गाझापट्टीत मूलभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बहुतांश लोकसंख्या विस्थापित झाली आहे. इस्रायलच्या सैन्य कारवाईमुळे लाखो लोकांना घर सोडावे लागले आहे. युद्धामुळे गाझामधील आरोग्य व्यवस्था आणि जनजीवनावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.
करावरून दिला होता इशारा
ट्रम्प यांनी यापूर्वी करावरून अनेक देशांना धमकाविले होते. ब्रिक्स देशांनी अमेरिकेच्या डॉलरला पर्याय उभारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सामग्रीवर 100 टक्के कर लादला जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
इस्रायलकडून समर्थन
ब्रिक्स देशांच्या डी-डॉलरायजेशनवरून ट्रम्प यांनी धमकी दिली होती. या मुद्द्यावर इस्रायलने ट्रम्प यांचे समर्थन केले आहे. डॉलरमध्ये व्यापार होणे हेच मुक्त विश्वाच्या हिताचे आहे. भारत कुठल्याही चलनाचा हिस्सा होणार असल्याचे वाटत नाही असे उद्गार इस्रायलचे मंत्री नीर बरकत यांनी काढले आहेत. वाईट लोक, शत्रू आणि दहशतवादी कोण याची व्याख्या ट्रम्प ठरवत अताहेत. इराण, कतार अमाच्या क्षेत्रातील शांततेला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही एकजूट होणे केवळ इस्रायलच्या हिताचे नसून मुक्त विश्वासाठी देखील हितकारक असल्याचे नीर बरकत यांनी म्हटले आहे.
भारत-इस्रायलला होणार फायदा
अध्यक्ष ट्रम्प हे स्वत:च्या अर्थव्यवस्थेला भू-राजकारणाशी जोडत आहेत, अमेरिकेचे सहकारी असाल तर तुमच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे उघडे असणार आहेत. तर विरोधक असाल तर मोठी किंमत मोजावी लागणार आहे. इस्रायल आणि भारतासोबत अमेरिकेचे चांगले संबंध असल्याने दोन्ही देशांना फायदाच होईल असे बरकत यांनी म्हटले आहे.









