बेळगाव : स्विमर्स आणि अॅक्वेरियस क्लब आयोजित 23 वी दिव्यांग आणि वंचित मुलांसाठी मोफत जलतरण प्रशिक्षण शिबिर केएलई जेएनएमसी जलतरण तलावात मोठ्या उत्साहात पार पडले.या शिबिरात बौद्धिक अपंग, दृष्टिदोष, शारीरिक आव्हाने, श्रवणदोष तसेच अनाथ आदीवासी आणि वंचितांसह 220 हून अधिक मुलांनी भाग घेतला होता. या शिबिरात पोहण्याच्या मुलभूत गोष्टी शिकविण्यात आल्या. यासाठी मोफत वाहतूक आणि पोहण्यासाठी लागणारे कपडे असे सर्व साहित्य देवून त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
सांगता समारंभाला बेंगळूर येथीला इन हाऊस योग प्रशिक्षक डॉ. जरीना मुबारकी, स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. मनीषा भांडणकर, गंगम्मा चिकुंबीमठाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राम मल्ल्या, माखी कपाडिया, स्वीमर्स क्लबच्या अध्यक्षा लता कित्तूर, आझमे मोदी, निरंजन कल्लोळी, सुधीर कुसाणे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जरीना यांनी दिव्यांग आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी मी सतत काम करत राहिन, असे आश्वासन दिले. हे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात देशासाठी पदक मिळवून अभिमान वाटावे, असे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. नितीश कुडुचकर, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतकर, अजित जेंतीकट्टी, समीर नदाफ, विनोद दोडमनी, शिवाजी मानमोडे, संजीव कांडे, विनायक, उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभले.









