सातारा :
स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोंसले यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्तव्य सोशल ग्रुप, सायन हॉस्पीटल मुंबई, क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मदतीने जिल्ह्यातील 96 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये दीड महिन्याच्या बालकापासून ते 15 वर्षाच्या मुलांपर्यंत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. यात हर्निया, हायड्रोसील, टंग टाय, सिस्ट अशा विविध आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश होता.
या शस्त्रक्रिया करण्याकरिता मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत छ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई येथील नामवंत पेडीयाट्रीक सर्जन डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी, डॉ. आमीर खान, डॉ. आदिती दळवी, डॉ. सुकन्या विंचूरकर, डॉ. क्षीतिजा पोखरकर, डॉ. मेहता, डॉ. रुचिता शहा आदी सर्व तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने 15 ते 17 मेपर्यंत उपास्थित राहून या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांना मदतीकरिता जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर्स, आर. बी एस. के पथक, परिचारिका व सर्व स्टाफ तसेच छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे भुलतज्ञ उपास्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालकांविषयी असलेले विचार नेमक्या शब्दात व्यक्त केले. ते म्हणाले, आजच्या बालकात उद्याच्या नव्या भारताचा आश्वासक चेहरा आहे. या चेहऱ्यावर चिंता नको तर आत्मविश्वास हवा. त्यामुळे मुलाचं आरोग्य म्हणजे राष्ट्रनिर्मितीचा पायाच आहे. सुदृढ बालक हीच देशाची खरी संपत्ती आहे. तसेच त्यांनी डॉ. संजय ओक व त्याची 10 जणांची टीम शस्त्रक्रियेकरीता मुंबईहून सातारा येथे आल्याबद्दल त्याचे विशेष आभार मानले. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व सर्व स्टाफ यांचे कौतुक केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. काळे, सिव्हिल सर्जन डॉ. करपे, डॉ. राहुल खाडे, डॉ. सुभाष कदम आणि कर्तव्य सोशल ग्रुपचे विजय देशमुख, अॅड. चंद्रकांत बेबले व सर्व टिम उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. संजय ओक यांनी शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात बोलवून आरोग्य सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. दरवर्षी 16 मे रोजी सातारा येथे शस्त्रक्रिया शिबिर घेण्याचे अभिवचन दिले. तसेच कर्तव्य सोशल ग्रुपच्या सर्व टिमचे विशेष कौतुक केले. तसेच ज्या 12 मुलांना विशेष शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्या सर्व मुलाची ठाण्यातील कौशल्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करुन देण्याबाबतचा मनोदय यावेळी डॉ. ओक यांनी व्यक्त केला.
या आरोग्य उपक्रमाचे मोल वाढवणारे एक पाऊल म्हणजे, कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा यांच्या पुढाकाराने व सत्यसाई हॉस्पिटल खारघर, नवी मुंबईच्या मदतीने मागील महिन्यात 15 मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ‘मोतिबिंदू मुक्त सातारा विधानसभा मतदारसंघ’ या कर्तव्य ग्रुप संकल्पित मोहिमेअंतर्गत एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, पुणे व नंदादीप हॉस्पिटल, सांगली यांच्या मदतीने 85 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मोहिमेतंर्गत सातारा व जावली तालुक्यामध्ये मोफत मोतिबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. पुढील काळातही अशीच समाजोपयोगी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गतही जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता निधीचे अविरतपणे वाटप होत आहे. हे सर्व समाजाप्रती संवेदनशील असलेल्या मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शक व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या वैयक्तिक सहभागाने शक्य होत आहे.
- पालकांची पाणावलेल्या डोळ्यांनी कृतज्ञता
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी उपस्थित सर्व पालकांशी व रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी अनेक पालकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शिबिरात दाखल झालेल्या पालक व बालकांची सर्व दैनंदिन व्यवस्था कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत छ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिममार्फत करण्यात आली. ग्रुपचे महेश यादव, राजू महाडिक, विलास कासार, महेंद्र गार्डे, विजय देशमुख, दीपक भोसले, डी. पी. शेख, प्रकाश घाडगे, अॅड. चंद्रकांत बेबले, राहुल धनावडे, बबलू सोलंकी आदींनी विशेष योगदान दिले.








