ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर :कोरोनामुळे (Corona) विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना मोफत बियाने देण्यात येत आहेत. हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.आज कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे हा स्तुत्य उपक्रम आहे असे कौतुकही केले.
कृषी मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले आहे. गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा असे आवाहनही त्यांनी केले. चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठीही सहकार्य करु असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा- राष्ट्रपतीपदासाठी बौद्धिक पातळी लागते; सदावर्तेंचा पवारांवर निशाणा
शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात सोयाबीन व कापूस उत्पादकता वाढीसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन पिकांची उत्पादकता वाढवावी. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.’विकेल ते पिकेल’ संकल्पनेप्रमाणे मागणीनुसार पिके घ्यावीत. तसेच आवश्यक तेवढ्या पाण्याचा वापर करुन जमिनीचा पोत सुधारावा. आणि उत्पादन अधिक होण्यासाठी ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जादा दर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी 50 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा- पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नका;कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पुढे बोलताना ते म्हणाले, १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यापुढे हा दिवस ‘कृषी संजीवनी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कृषी सप्ताह साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यानिमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद,त्यांचे योग्यपद्धतीने पोषण व्हावे, यासाठी ‘किट’ देण्यात येणार आहे.तसेच आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ‘किट’ घ्यावे व जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वितरीत करावे असे आवाहन त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना दिली. या भागात शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कृषी क्षेत्राच्या संपन्नतेसाठी ओळखला जातो. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऊस उत्पादकता वाढ मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अल्प काळाचे पिक उत्पादन, नवीन जोडधंदे याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. शिरोळ, हातकणंगले तालुक्याचे पोषक हवामान पाहता याठिकाणी संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.









