प्रतिनिधी,कोल्हापूर
एस.टी.महामंडळाच्या निवृत्त कर्मचार्यांना सहा महिन्याऐवजी वर्षभराचा एस.टी.बस प्रवासाचा पास राज्य सरकारने द्यावा, सध्या मिळणारी पेन्शनही तुटपुंजी असून त्यामध्ये वाढ करावी,अशी मागणी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे,कोषाध्यक्ष गणेश वायफळकर,संघटक रवि जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
विचारे व वायफळकर म्हणाले,राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कर्मचार्यांना समाजामध्ये मानसन्मान मिळवून देण्यासाठी संघटनेतर्फे प्रयत्न सुऊ आहेत.सध्या एस.टी.च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा मोफत बस प्रवासाचा पास मिळतो.तोही साध्या बसेसमधून,त्या बसेसचे प्रमाणही आता कमी झाल्याने अडचणी निर्माण होत आहे.त्यामुळे हा पास एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बसेससाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावा.या योजनेमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची विधवा पत्नी तसेच विधुरांचाही समावेश करावा.त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय उपचाराकरीता येणाऱ्या खर्चाची परिपुर्तता करावी.सध्या मिळणारी पेन्शन तुटपुंजी असून त्यामध्ये वाढ करावी,अशा मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
रवि जाधव म्हणाले, एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरी भरतीमध्ये 5 टक्केचे प्रमाण ठेवावे. महामंडळाच्या बसस्थानकावर निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या पाल्यांना दुकान देण्याच्या धोरणात अग्रस्थान द्यावे.यावेळी विभागीय अध्यक्ष कमलाकर रोटे,सचिव बाबा कोकणे,ईमाम राऊत,व्ही. बी.देशपांडे,बाबासाहेब तुपे,संजय मोरे,सदानंद भालकर आदी उपस्थित होते.









