शिरोडा : बोरी पंचायत क्षेत्रातील कलमामळ व शिरशिरे या लोकवस्तीमध्ये बिबट्याचा संचार वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्याभरात रात्रीच्यावेळी तसेच दिवसाही मुक्तपणे फिरणारा हा बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडला. एका व्यक्तीने भर लोकवस्तीमध्ये फिरणाऱ्या या बिबट्याच्या हालचालींचे चित्रीकरण आपल्या मोबाईलवर केल्यानंतर वनखात्याने त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धनाथ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या काही घरातील पाळीव कुत्री तसेच काही बागायतदारांच्या गोठ्यांतील वासरांचा बिबट्याने फडशा पाडल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. तसेच तेथील एका गुरांच्या गोठ्याजवळ बिबट्याची मादी आढळून आली होती. या प्रकारानंतर आता दाट लोकवस्ती असलेल्या शिरशिरे व कलमामळ भागाकडे बिबट्याने आपला मोर्चा वळविला आहे. कलमामळ प्रभागातील तळसाय येथे स्वामी विवेकानंद विद्यालय तसेच प्राथमिक शाळा आहे. या विद्यालयाच्या नजीकच बिबट्याचा संचार आढळून आला आहे. सध्या शाळेला नाताळाची सुट्टी असली तरी येत्या दोन दिवसांत शाळा सुऊ होणार आहेत. त्यामुळे पालक वर्गामध्येही भितीचे वातावरण आहे. रात्रीच्यावेळी कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्याने बिबट्या जवळपास फिरकत असल्याचे संकेत मिळताच लोक आपले दरवाजे व खिडक्या लावून घेतात. बिबट्याच्या संचाराच्या तक्रारी वनखात्याकडे पोचल्यानंतर वन पथकाकडून परिसरात टेहळणी करण्यात आली. तसेच त्याला पकडण्यासाठी पिंजराही लावला आहे.
Previous Articleकळंगुटमध्ये मदर केअर बूथ, बेबी फिडिंग बूथ सुरू
Next Article पांझरखणी-कुंकळळी अपघातात युवक जागीच ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









