बालपणी प्रत्येकाला काही ना काही जमा करण्याचा छंद असतो. कोणी पोस्टाची तिकिटे जमा करतात तर कोणी सुटी नाणी. बऱयाचदा हे छंद जोपासण्यासाठी पदरमोड करावी लागते. काही लोक लहानपणीचे हे छंद मोठेपणीही प्राणपणाने जपतात. ब्रिटनमधील यॉर्कशायर येथील रहिवासी 36 वषीय मॅथ्यू याला असाच सुटी नाणी जमा करण्याचा छंद होता. बाजारातील खरेदी केल्यानंतर मिळालेले सुटे पैसे कोणालाही न देता तो आपल्याजवळ साठवून ठेवत असे.
आता याच सुटय़ा नाण्यांनी त्याला श्रीमंत बनविले आहे. कारण, त्याने साठविलेल्या नाण्यांमधील अनेक नाणी अत्यंत दुर्मीळ असल्याचे नंतर त्याच्या लक्षात आले. या दुर्मीळ नाण्यांना त्यांच्या दर्शनी किमतीपेक्षा कित्येक हजारपट अधिक रक्कम मिळू शकते. नाणे जितके अधिक जुने आणि जितके कमी वापरलेले तितकी किंमत जास्त मिळते. त्याने कैक वर्षे जुनी दुर्मीळ नाणी साठवून ठेवल्याने त्यांचा वापरही कमी झाला. साहजिकच त्याला या नाण्यांची प्रचंड किंमत आता मिळत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार 2009 मध्ये चलनात आलेले ‘केवगार्डन’ हे 50 शिलिंगचे नाणे अत्यंत दुर्मीळ असून त्याला सर्वाधिक किंमत येते. या प्रकारची केवळ 2 लाख नाणीच शिल्लक आहेत. त्यापैकी त्याच्याकडे 300 हून अधिक नाणी आहेत. त्याला आता रोज लोकांचे फोन येत असून साठवून ठेवलेल्या नाण्यांचा त्याने व्यापार सुरू केला आहे. तो फेसबुकवर या नाण्यांची विक्री करतो. 50 शिलिंगचे एक नाणे 157 पौंडांमध्ये त्याने नुकतेच विकले आहे. या नाणेविक्रीतून काही लाख पौंड मिळतील, अशी त्याची अपेक्षा आहे.
लहानपणी लागलेली ही नाणी वाचविण्याची सवय आता त्याला अनपेक्षित परतावा मिळवून देत आहे. शेअरबाजार किंवा अन्य ठिकाणी मिळणाऱया परताव्यापेक्षाही हा लाभ कितीतरी जास्त असल्याचा त्याचा अनुभव आहे. नाणी जमविण्याच्या त्याच्या या छंदाने त्याला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही दिले आहे.









