ग्रामीण-वंचित घटकांतील 250 हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ
बेळगाव : शिवाजीनगर येथील कसबेकर-मेटगुड क्लिनिक या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ ग्रामीण व वंचित पार्श्वभूमीतील सुमारे 250 हून अधिक नागरिकांनी घेतला. महत्त्वाच्या आरोग्य तपासणी आणि अस्थि घनता, रक्तातील साखर, संपूर्ण रक्त काऊंट, मूत्र मायक्रोस्कोपी यासारख्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. महिलांची आरोग्य तपासणी प्रख्यात गायनॅक सुपरस्पेशालिस्टकडून करण्यात आली. किशोरवयीन मुलांची तपासणीही करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बसवराज मेटगुड म्हणाले, समाजातील मोठा वर्ग विशेषत: वंचित घटकांतील रुग्ण योग्य आरोग्य तपासणी आणि निदानापासून वंचित आहेत. या शिबिराचा उद्देश या लोकांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत व्हावी हा होता. डॉ. बसवराज मेटगुड यांच्यासह डॉ. प्रदीप शांतागिरी, डॉ. प्रताप वैद्य, डॉ. केतकी भोसले, डॉ. पुष्पा बिरादार यांचा समावेश असलेल्या सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी व मोफत सल्ला दिला. संचालिका स्वरूपा मेटगुड, आनंद चिकली, राहुल देसाई, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले.









