वृत्तसंस्था/डंबुला (श्रीलंका)
येथे 19 जुलैपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट शौकिनांकरिता स्पर्धा आयोजकांनी मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे.
या स्पर्धेत हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाचा सलामीचा सामना पाकबरोबर डंबुलातील स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये यजमान लंका, भारत, पाक, बांगलादेश, युएई, नेपाळ, मलेशिया, थायलंड हे संघ सहभागी होत आहेत. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 15 सामने खेळविले जाणार आहेत. अ गटात पाक, भारत, युएई व नेपाळ तर ब गटात बांगलादेश, लंका, मलेशिया व थायलंड यांचा समावेश आहे. आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला 19 जुलैपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना युएई आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. तर यजमान लंकेचा सलामीचा सामना 20 जुलैला बांगलादेश बरोबर होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी युएई आणि नेपाळ यांच्यातील सामन्यातील दुपारी 2 वाजता तर भारत आणि पाक यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल.









