मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी ‘आप’ची घोषणा
► वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही. अशा स्थितीत भाजप-काँग्रेसशिवाय इतर मोठे पक्षही राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. अरविंद केजरीवाल यांचे लक्ष मध्य प्रदेशकडे असून ते रविवारी सतना दौऱ्यावर होते. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील जनतेला मोफत वीज आणि वैद्यकीय उपचार देण्याबरोबरच अनेक गॅरंटी देण्याची घोषणा केली.
दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार 24 तास वीज देत आहे. आता मध्य प्रदेशातही फक्त आम आदमी पार्टीच वीज पुरवेल. तसेच नोव्हेंबरपर्यंतची जुनी वीजबिल माफ केली जातील, असे केजरीवाल म्हणाले. 16 मार्च रोजी पंजाबमध्ये आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंजाबमध्ये जुनी बिले माफ करण्यात आल्याचा दाखलाही त्यांनी दिला. आम आदमी पक्षाने दिल्लीच्या सरकारी शाळा उत्कृष्ट केल्या आहेत. सरकारी शाळेत शिक्षकच नव्हते, भिंतींना तडे गेले होते. आम्ही उत्तम शाळा बांधल्या. मध्य प्रदेशातील सरकारी शाळाही भव्य बनवल्या जातील. आज दिल्लीत गरिबांची मुलं डॉक्टर आणि इंजिनिअर होत आहेत. अशी व्यवस्था मध्य प्रदेशातही तयार केली जाईल, असे ते पुढे म्हणाले. याशिवाय औषधोपचार मोफत देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असून जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत बेरोजगारांना दरमहा 3000 ऊपये देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मुख्य आश्वासनांबरोबरच वृद्धांना मोफत तीर्थयात्रा, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांना विशेष मानधन, शेतकरी आणि आदिवासींसाठी वेगवेगळी आमिषे देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.









