मच्छीमारी-बंदर विकास खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी दिली योजनेला चालना
कारवार : राज्य सरकारच्या ‘शक्ती’ योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्याच्या सुविधाला जिल्हा पालकमंत्री आणि मच्छीमारी व बंदर विकास खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनी रविवारी येथील बसस्थानकावर चालना दिली. यावेळी बोलताना वैद्य म्हणाले, निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात पाच गॅरंटी अंतर्गत वेगवेगळ्या सुविधांचे आश्वासन दिले होते. यापैकी एका आश्वासनाची पूर्तता काँग्रेस सरकारने केली आहे. मोफत बसप्रवास सुविधेचा लाभ उठवून महिलांनी आपला जीवनस्तर उंचवावा. राज्यातील प्रत्येक खेड्यामध्ये लवकरच बस वाहतूक सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार सतीश सैल म्हणाले, बोले तैसा चाले याप्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अधिक वेळ न घालविता राज्यातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा आजपासून उपलब्ध करून दिली आहे. परिवहन महामंडळाच्या चालकांनी आणि वाहकांनी महिला सुरक्षितपणे कशा प्रवास करतील याची काळजी घेतली पाहिजे.कारवार ते कुमठा दरम्यान धावणारी बस आकर्षकरित्या सजविली होती. मंत्री वैद्य यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला तर आमदार सैल यांनी महिलांना तिकीट देण्याची जबाबदारी पार पाडली. यावेळी जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवळीकट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख विष्णूवर्धन एस., साई गावकर, शंभू शेट्टी, माधव नाईकसह कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
रामनगरमध्ये महिलांनी घेतला मोफत बस प्रवासाचा लाभ
काँग्रेस पक्षाने दिलेल्या महिला मोफत बसप्रवास योजनेला रविवारपासून कर्नाटकात सर्वत्र प्रारंभ झाला. जोयडा तालुक्यात ही सदर मोफत बस प्रवास योजनेची रविवारी दुपारी एकपासून मान्यवरांच्या हस्ते बसची पूजा करून सुरुवात करण्यात आली. तर याचा फायदा प्रथम दिवशीच महिलावर्गांनी पुरेपूर घेतला. तर काही महिलांनी आपले ओळखपत्र मोबाईलमधून दाखवल्याने त्यांना मोफत प्रवास असतानाही तिकीट काढावे लागले. तर बसस्थानकावर प्रथम दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









