शक्ती योजनेला पालकमंत्र्यांच्या हस्ते चालना : महिलांना देणार गुलाबी रंगाचे शून्य तिकीट
बेळगाव : महिलांसाठी मोफत बसप्रवास ‘शक्ती’ योजनेचा रविवारी दुपारी प्रारंभ झाला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार असीफ सेठ, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या व मान्यवरांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून या योजनेला चालना देण्यात आली. बेळगाव व चिकोडी विभागातर्फे महिलांच्या मोफत बसप्रवासाला मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे महिलांना आता ओळखपत्र दाखवून मोफत बसप्रवास करता येणार आहे. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, निवडणुकी दरम्यान दिलेली आश्वासने काँग्रेस सरकार पूर्ण करीत आहे. महिलांना मोफत बसप्रवास हा ऐतिहासिक निर्णय असून नोकरदार आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना सोयिस्कर होणार आहे. याबरोबर शैक्षणिक, व्यावसायिक कौशल्य विकास आणि महिला सबलीकरणासाठी शक्ती योजना महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार असीफ सेठ यांनी ही योजना महिलांसाठी सुखकर ठरणार असल्याचे सांगितले. बेळगाव विभागात खानापूर, रामदुर्ग आणि सौंदत्ती आगारांचा समावेश आहे. या सर्व आगारांमध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विविध मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांच्या पैशाचीदेखील बचत होणार आहे. सध्या महिलांना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना दाखवून प्रवास करता येणार आहे. त्यानंतर महिलांसाठी स्मार्ट शक्तीकार्ड देण्यात येणार आहे. यासाठी सेवा सिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. सध्या बसमध्ये प्रवास करताना महिलांना एखादे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. शिवाय कंडक्टर महिलांसाठी गुलाबी रंगाचे शून्य तिकीट देणार आहेत.
बसला वाढणार महिलांची गर्दी
रविवारी दुपारपासून महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा सुरू झाली आहे. रविवारी शासकीय सुटी असल्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, सोमवारपासून सरकारी बसना गर्दी वाढणार आहे. सर्व बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. शिवाय खासगी वाहनांच्या तुलनेत महिला परिवहनच्या बसला पसंती देणार आहेत. मोफत प्रवास असल्याने थोडा वेळ बसस्थानकावर थांबून बसलाच पहिले प्राधान्य दिले जाणार आहे.









