पहिली गॅरंटी होणार लागू, ओळखपत्र आवश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यापैकी महिलांना मोफत बसप्रवासाची योजना रविवारपासून कार्यान्वित होत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान महिलांना एक ओळखपत्र स्वत:जवळ ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून ही मोफत बससेवा सुरू होणार आहे.
एकूण प्रवाशांपैकी महिला प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे. या सर्व महिला व विद्यार्थिनींना या मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये महिला प्रवाशाने कोणत्या ठिकाणाहून प्रवास केला, भाडे किती याचा तपशीलदेखील बसवाहकाला ठेवावा लागणार आहे. प्रवासादरम्यान महिलांना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, मतदान कार्ड किंवा रेशनकार्ड स्वत:जवळ ठेवावे लागणार आहे.
निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने पाच गॅरंटी योजनांचे आश्वासन दिले होते. यामध्ये महिलांसाठी मोफत बसप्रवासाची एक गॅरंटी योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी रविवारपासून होणार आहे. त्यामुळे महिलांचा मोफत बसप्रवास सुसाट सुरू होणार आहे. महिलांना राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता महिलांना विविध ठिकाणी या मोफत बसप्रवासाच्या आधारे ये-जा करता येणार आहे.
महिला प्रवाशांची संख्या वाढणार
शासनाने सरकारी बसमध्ये महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सरकारी बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. रविवारपासून महिला प्रवाशांनी बसेसदेखील फुल होताना दिसणार आहेत. शासनाच्या या योजनेमुळे प्रवासी महिलांच्या पैशाची बचत होणार आहे.









