हॉल तिकिटाद्वारे विनातिकीट करता येणार प्रवास : परिवहनचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावी परीक्षेला 31 मार्चपासून प्रारंभ होत आहे. या काळात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान परीक्षा प्रवेशपत्र दाखवून विनातिकीट प्रवास करता येणार आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता यावे, यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. काही विद्यार्थी परीक्षा केंद्रापासून दूरवर राहतात. दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय व्हावी, यासाठी विनातिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राजवळ बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे, अशा सूचनादेखील बसवाहक व चालकांना करण्यात आल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात सर्व बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. शहर, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट दाखवून परीक्षाकाळात विनामूल्य प्रवास करावा, असे आवाहनदेखील परिवहनने केले आहे.









