गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासियांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्dयाचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. मात्र कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 12 वर्षापासून रखडला आहे. गेल्या 15 दिवसांत महामार्गप्रश्नी पत्रकारांचे आंदोलन, बांधकाम मंत्र्याचे पाहणी दौरे, मनसेच्या खळ्खट्ट्याक आंदोलनामुळे कोकणवासियांत तीव्र चीड निर्माण झाली असताना आणि येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन आता कोकणवासियांच्या या वेदनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात मोफत बस प्रवास आणि टोलमाफी जाहीर करत फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी गणेशोत्सवाला 19 सप्टेंबरला प्रारंभ होत आहे. बाप्पाच्या श्रद्धेपोटी गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी व नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा व सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे गणेशोत्सव जवळ येऊ लागला आहे, तसतसे कोकणवासीय चाकरमान्यांना त्याचे वेध लागले आहेत.
कोकणाला जोडण्यासाठी तसेच कोकणवासीय चाकरमान्यांच्या सोईसाठी महत्वाकांक्षी कोकण रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतीक्षा याद्यांचे फलक लागले आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने शेकडो गणपती स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. मात्र सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करून चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरू असते. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र त्यावर चर्चेशिवाय काहीच होताना दिसत नाही.
बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. यावर्षी महामंडळाने 14 ते 19 सप्टेंबरदरम्यान 3 हजार 100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी सुमारे 2 हजारादरम्यान बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे. गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 14 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच खासगी व इतर खासगी वाहनांचेही बुकोग झाले आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने चाकरमानी या उत्सवाला येणार आहेत.
कोकणात कोकण रेल्वेनंतर एकमेव सुरक्षित प्रवास म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तसेच या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावऊन प्रवास करणे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हा पर्याय सुध्दा व्यवहार्य ठरत नाही. दरवर्षी गणेशोत्सवा†ना†मत्ताने मुंबई, ठाणे, पालघरमधून मोठ्या संख्येने नागा†रक रस्तेमार्गे कोकणात जातात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते.
मुख्यमंत्र्यांकडून मोफत एसटी बस प्रवास
रखडलेल्या महामार्गाबाबत कोकणी जनतेत संताप व्यक्त असतानाच त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिंदे गटाकडून मोफत एसटी प्रवास उपलब्ध कऊन देण्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभेतून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. शनिवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात बैठक पार पडली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होत असल्याचे यानिमित्ताने पहायला मिळत आहे. मात्र या निर्णयाचे फारसे स्वागत होण्याऐवजी मोफत प्रवास नको, त्याऐवजी रस्ते व्यवस्थित सुधारा, प्रवासासाठी दर्जेदार सोयी-सुविधा पुरवा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
रखडलेल्या महामार्गावरून पत्रकारांचे आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्टला रायगड प्रेस क्लबच्यावतीने महामार्गावरील वाकण फाटा येथे रस्त्यावरील ख•dयातील पाण्यातच ठिय्या आंदोलन करत लोकप्रतिनिधींच्या नावाने शिमगा केला. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे एस. एम. देशमुख यांनी महामार्गाच्या कामात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे असलेले आर्थिक हितसंबंध हेच महामार्गाच्या विलंबासह दुरवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप करत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण न झाल्यास 15 सप्टेंबर रोजी सर्व लोकप्रतिनिधींच्या दारासमोर पत्रकारांचे बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महामार्गप्रश्नी असलेल्या निक्रियतेसाठी कोकणातील लोकप्रतिनिधींना 10 हजार एस.एम.एस. पाठवण्यात आले. रत्नागिरी, सिंधुदुर्गातही स्थानिक प्रशासनाला पत्रकारांकडून निवेदने देण्यात आली.
महामार्गप्रश्नी मनसेचा खळ्खट्ट्याक
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये घेतलेल्या मेळाव्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून झालेल्या दुरवस्थेसाठी राजकीय पक्ष आणि कोकणातील नेत्यांना जबाबदार धरत मनसे कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन केले. ठाकरे यांच्या आवाहनानंतर रायगडमध्ये त्याचे पडसाद उमटले. पण रत्नागिरीमध्ये राजापूर-हातिवले टोलनाक्याची तसेच रत्नागिरी-पाली येथेही खळ्खट्ट्याक पध्दतीने जोरदार आंदोलन करत ठेकेदाराचे कार्यालय व यंत्रसामुग्रीची तोडफोड केली. जिल्ह्यात इतरत्रही आंदोलन करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंत्र्यांचा सातवा महामार्ग पाहणी दौरा
सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून रवींद्र चव्हाण हे सातत्याने मुंबई-गोवा महामार्गचे पाहणी दौरे करत आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी महामार्गचा आपला सातवा पाहणी दौरा केला. थोड्याफार सुधारणा, कामाला गती मिळत असली तरी दौऱ्याची फलनिष्पत्ती येत्या गणेशोत्सव काळात कळणार आहे. प्रत्येक दौऱ्यात ते सांगत आहेत. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी महामार्गची एक लेन पूर्ण होण्याच्यादृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे किरकोळ ठिकाणचे अपवाद वगळता महामार्ग सुस्थितीत राहण्यास कोणती अडचण राहील, असे वाटत नाही.
राजेंद्र शिंदे








