खानापूर ; शासनाने महिलांना मोफत बसप्रवास योजना सुरू केली आहे. त्याबद्दल स्वागतच आहे. मात्र खानापूर तालुक्याची व्याप्ती पाहता आणि आता महिलांना बस प्रवास मोफत झाल्यामुळे महिला आणि विद्यार्थी खासगी वाहनातून प्रवास करण्याचे टाळणार आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सरकारने खानापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मोफत बसप्रवास सेवेच्या उद्घाटनप्रसंगी केले. कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आलेल्या स्त्री शक्ती योजनेअंतर्गत मोफत बससेवा योजनेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. खानापूर बस आगारांतर्गत मोफत स्त्रीशक्ती योजनेचा शुभारंभ खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते केला. यावेळी खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, मेघा कुंदरगी, विनोद कलाल, रफिक वारीमनी, तोहीद चांदकन्नावरसह तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रवी नाईक, खानापूर पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांनी केले. या योजनेसंदर्भात बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. काँग्रेसच्या पाच हमी योजनेपैकी एक असलेल्या शक्ती योजनेच्या अंतर्गत रविवारपासून महिला राज्य सामान्य परिवहन बसमधून कुठेही आणि कधीही मोफत प्रवास करू शकतात. चार महामंडळांच्या एसी आणि एक्स्प्रेस बसेस वगळता सामान्य बसेसमध्ये प्रवास करू शकतात. बाहेरील राज्यांमध्ये चालणाऱ्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी नाही. मोफत प्रवास करताना महिलांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले निवासी ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आपल्यासोबत ठेवणे आवश्यक आहे. यासह या योजनेसाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली असून नजीकच्या सायबर सेंटरमधून किंवा सेवा सिंधू पोर्टलद्वारे नोंदणी करून स्मार्ट कार्ड मिळवता येते. यासाठी देखील आधार कार्ड किंवा कोणत्याही निवासी ओळखपत्राच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हे स्मार्ट कार्ड सरकारतर्फे मोफत देण्यात येणार आहे.









