राजू सेठ : अशोकनगर येथे प्रचारफेरी
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा जोरदार प्रचार सुरू असून जनतेकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी सकाळी अशोकनगर भागात प्रचारफेरी काढून घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या व काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेसच्या योजनाची माहिती देऊन, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर योजना प्राधान्याने राबवणार आहे, असे आश्वासन दिले.
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर महिलांसाठी मोफत बसप्रवास योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आपल्या अशोकनगर येथील प्रचारादरम्यान केली. सर्व जातीधर्माच्या, सर्व भाषिक मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. राज्यातील जनता भाजप राजवटीला कंटाळली आहे. भाजप सरकारने केलेल्या सर्व प्रकारच्या दरवाढीमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनतेला बदल हवा असून काँग्रेसचे हमीपत्र हे केवळ आश्वासन नसून सत्तेत आल्यानंतर सर्व गोष्टींची आम्ही प्राधान्याने पूर्तता करू असे राजू सेठ यांनी सांगितले.
अशोकनगर भागातील रहिवासी असलेल्या अॅड. पूजा यांनी, परिसरातील रहिवाशांच्यावतीने आसिफ सेठ यांना पाठिंबा दर्शविला. त्यांनी या भागातील समस्या जाणून घेऊन, त्या सोडवण्याची हमी दिली आहे. यावेळी परिसरातील महिला वर्ग व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आसिफ सेठ यांना पाठिंबा दर्शवून निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी अशोकनगर भागातील कार्यकर्त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश केला. प्रचारदौऱ्यात काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू सेठ यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान उत्तर मतदारसंघात येणाऱ्या पोलीस हेडक्वॉर्टर्स, चांभार गल्ली, बसवनकोळ, चिंचमार्केट अशा विविध परिसरात भेट देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. रामतीर्थनगर येथे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले असून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व रात्री सागर कॉलनी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली.









