योगेश निलजकर यांचा स्तुत्य उपक्रम
वार्ताहर/किणये
बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचालित बिजगर्णी हायस्कूलमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना बिजगर्णी गावचे सुपुत्र योगेश अर्जुन निलजकर यांच्यावतीने मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव होते. योगेश निलजकर हे सध्या अमेरिका येथे नोकरीला आहेत. आपल्या गावातील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ते दरवर्षी हायस्कूलसाठी विविध उपक्रम राबवितात. देणगी स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत करतात. यावर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना सायकली दिल्या. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक वाय. एच. पाटील यांनी करून शाळेच्या 40 वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन, संस्था सचिव ए. के. निलजकर यांनी स्वागत केले.यावेळी वाय. पी. नाईक यांनी मार्गदर्शन करून, अभ्यासाबरोबरच विविध छंद जोपासावे, जिद्द, चिकाटी, कौशल्य या गुणांनी गाव व शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व सुभेदार मेजर सुधाकर जाळके यांनीही मौलिक विचार व्यक्त कले. खेळाडू प्रियांका शिवाजी तारीहाळकर हिलाही महात्मा गांधी संस्थेकडून रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन प्रोत्साहन दिले. यावेळी यल्लापा बेळगावकर, अशोक कांबळे, मनोहर पाटील, के. आर. भास्कर, पुंडलिक जाधव, संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी केले. क्रीडा शिक्षक अरुण दरेकर यांनी आभार मानले.









