घरी एकट्या असणाऱ्या मुलांची करतात देखभाल
जगात एकीकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असताना मुलांची घरात देखभाल कशी करावी असा प्रश्न उभा ठाकत आहे. याकरता सद्यकाळात डे-केयर सेंटर, क्रेच किंवा बोर्डिंग स्कुल्सचा मार्ग अवलंबिला जात आहे. परंतु अनेक लोक स्वत:च्या मुलांना घरातील आरामदायी वातावरणात ठेवू इच्छितात.
भारतातही मुलांप्रकरणी अन्य कुणांवर भरवसा करणे सोपे नव्हते. अशाच प्रकारे चीनमध्ये देखील मुलांना घरी एकटे ठेवणे अवघड आहे. याच समस्येवर तोडगा महणून चीनमध्ये सध्या आजींची पूर्ण फौज तयार असून ती लोकांना मदत करू इच्छिते. या आजी नोकरी करणाऱ्या पालकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मुलांची देखभाल करण्यास तयार आहेत. याकरता त्यांच्याकडून कुठलेच शुल्क आकारण्यात येणार नाही.

चीनच्या जेनजियांग प्रांतात वेनजाउमध्ये हुइजिन जियायुआन नावाचा समुदाय आहे. या समुदायाकडूनच मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये हा पुढाकार सुरू करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या आजींची चर्चा होत आहे. या टीममध्ये एकूण 26 आजी असून त्यांचे वय 47-78 वर्षांदरम्यान आहे. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या पालकांना या आजी मदत करत आहेत. या आजींपैकी अनेक जणी निवृत्त शिक्षिका, डॉक्टर किंवा पक्ष कार्यकर्त्या आहेत. काही महिलांनी तर अनेक वर्षांपर्यंत आई आणि आजी होण्याची जबाबदारी पेललेली आहे. अशा स्थितीत या आजींना मुलांना हाताळणे सोपे ठरत आहे.
या आजी कम्युनिटी सेंटरमध्ये राहतात आणि मुलांची शाळा संपल्यावर त्यांची देखभाल करतात. तसेच त्यांचा होमवर्क देखील करवून घेतात. अनेक आजी तर या मुलांना इतर कौशल्ये देखील शिकवत आहेत. मुलांना कॅलिग्राफीसोबत बुद्धीबळ खेळणे त्या शिकवत आहेत. या आजींच्या सान्निध्यात ही मुले देखील अत्यंत आनंदी दिसून येतात. ही मुले त्यांच्याकडे संध्याकाळी 4 वाजल्यापासून त्यांचे आईवडिल येईपर्यंत असतात.









