सीईएन पोलिसांनी तरुणाला पुण्यातून घेतले ताब्यात
बेळगाव : फसवणूक प्रकरणी पुणे येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा सीईएन विभागाने त्याची चौकशी सुरू केली असून निपाणी परिसरात तब्बल दीड कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीचा प्रकार घडला होता. सागर (वय 35) असे त्याचे नाव आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन सागरला तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेतले आहे. सोमवारी पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणीही केली आहे. उपलब्ध माहितीनुसार 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात दहा महिन्यांत दुप्पट परतावा देण्याचे सांगून अनेकांकडून पैसे भरून घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. खासकरून निपाणी परिसरातील गुंतवणूकदारांची सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार सागरला महाराष्ट्रात अटक झाली होती. फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.









