रत्नागिरी, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने तरूणाला 31 हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना 20 मार्च ते 30 मे 2023 दरम्यानच्या काळात घडली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरूणाने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मोबाईलवर अज्ञाताने मेसेज करून तुम्हाला एक टास्क देण्यात येणार आहे. हा टास्क तुम्ही पूर्ण केल्यास तुम्हांला पैसे देण्यात येतील़ मात्र या टास्कसाठी सुरूवातीला पैसे भरावे लागतील, अशी बतावणी करण्यात आली. दरम्यान, अज्ञात व्यक्तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी टास्कसाठी एकूण 30 हजार 720 इतकी रक्कम भरली. मात्र ही रक्कम तक्रारदार यांना परत न देता फसवणूक केली, अशी तकार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.









