तिघींची सुटका; राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नांना यश
पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातून सौदी अरेबियाला नेऊन नोकरीच्या बहाण्याने तरुणींचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण व उपासमार सोसाव्या लागलेल्या या तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, राज्य महिला आयोगाने या सर्व प्रकाराला वाचा फोडली आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित दलालाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
राज्य महिला आयोगाने सुटका केलेल्या संबंधित तिन्ही तरुणी या एकाच कुटुंबातील असून घरावर कर्ज असल्याने त्यांना ओळखीच्या महिलेने सौदी अरेबियात काम करण्यासाठी जाण्याचा सल्ला देत मदत केली असल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार, त्या मुंबईतील एका एजंटामार्फत सौदी अरेबियात गेल्या. तेथील एजंटने त्यांना वेगवेगळय़ा ठिकाणी घरकामासाठी पाठवले. मात्र, घरमालकांकडून त्यांना मारहाण करण्याबरोबरच उपाशीपोटी ठेवले गेले. ठरल्याप्रमाणे महिन्याला 40 हजार पगारही देण्यात येत नव्हता. त्यामुळे त्यांनी मुंबईतील दलालाशी संपर्क साधून परत भारतात आणण्याची विनंती केली. मात्र. त्याच्याकडून सातत्याने टाळाटाळ होत होती.
पीडित महिलेला व्हिडिओच्या माध्यमातून राज्य महिला आयोगाचा मेल आयडी मिळाला. यातील एका महिलेने तेथे मेल करून सुटका करण्याची विनंती केली. त्यानुसार महिला आयोगाने मागील तीन महिने सातत्याने प्रयत्न करून त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया राबवली. त्यानंतर आठ दिसांपूर्वीच त्या पुण्यात दाखल झाल्या. राज्य महिला आयोगाने आजवर 20 महिलांची परदेशातून सुटका केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. यातील अधिकांश महिला गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीनिमीत्त गेलेल्या आहेत. तेथे गेल्यावर एजंट पासपोर्ट व इतर कागदपत्रे काढून घेतात. ठरल्याप्रमाणे पगारही देत नाहीत. याप्रकारे परदेशात नोकरीसाठी गेलेल्या महिलांनी फसवणूक झाली असल्यास त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी राज्य महिला आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी या वेळी केले.









