जिल्ह्यातील 151 महिलांची हजारोंची फसवणूक
गुहागर प्रतिनिधी
सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा घरबसल्या रोजगार मिळवून देतो, असे सांगत जिल्ह्यातील 151 महिलांची जळगावातील एका ठगाने फसवणूक केली आहे. सभासद फी व कच्चा माल देण्याच्या नावावर 72 हजार 601 रूपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी येथील महिलांनी केलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप शरद मुळे-पाटील (जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबत गुहागर पोलीस ठाण्यात महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, 10 जून 2022 रोजी मुळे-पाटील याने व्हाट्सॲप ग्रुप तयार केला. त्यानंतर जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो, असे सांगत महिलांची तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले. या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांची सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरुवातीचे काही महिने लवकरच कच्चा माल पाठवून देतो, असे सांगत चालढकल केली. काही महिलांनी या बाबत ग्रुपवर आवाज उठवला असता संदीप मुळे (पाटील) याने धमकीही दिली. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेतली. जिल्ह्यातील 151 महिलांकडून सभासद शुल्क म्हणून प्रत्येकी 351 रुपयांप्रमाणे 53,001 रूपये तसेच कच्चा माल व मशीन यासाठी 19,600 रुपये अशी एकूण 72 हजार 601 रुपयांची फसवणूक झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी गुहागर पोलिसांनी संदीप मुळे-पाटील यायाविरोधात भादंवि कलम 406, 419, 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करत आहेत.









