बेळगाव : खरेदी केल्यानंतर फोन पे वरून रक्कम अदा करण्याचे सांगून दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याने आपली ओळख लपविण्यासाठी नामी शक्कल लढविली आहे. मोटारसायकलच्या नंबरवरून कोणी आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी शेवटच्या क्रमांकावर त्याने चिकटपट्टी लावली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जुने बेळगाव, हलगा, बस्तवाड परिसरात एका भामट्याचा उपद्रव वाढला आहे. एखाद्या दुकानात खरेदी केल्यानंतर फोन पे च्या माध्यमातून पैसे देण्याचे सांगून तो क्युआर कोड स्कॅन करतो. दुकानदाराचे नाव दिसले की रक्कम जमा झाली बघा, असे सांगत तेथून निसटतो.
आठ दिवसांपूर्वी बस्तवाड येथील एका किराणा दुकानात या भामट्याने दोन हजार रुपयांची खरेदी केली. क्युआर कोड स्कॅन करून पैसे जमा न करताच तेथून पलायन केले. त्यानंतर जुने बेळगाव येथेही त्याने असाच प्रकार केला. मात्र, दुकानदाराच्या दक्षतेमुळे त्याची फसवणूक वेळीच लक्षात आल्यामुळे त्याला पूर्ण पैसे द्यावे लागले. या भामट्यावर संशय येऊन दुकानदाराने त्याच्या दुचाकीचा फोटो काढून घेतला. त्यावेळी त्यालाही धक्का बसला. नंबरवरून दुकानदार किंवा पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी भामट्याने शेवटच्या अंकावर पांढरी चिकटपट्टी लावली आहे. त्यामुळे त्याची फसवणूक लक्षात येऊनही त्याच्यापर्यंत पोहोचणे दुकानदारांना कठीण जात आहे.









