इचलकरंजी येथील घटना
शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल
इचलकरंजी
कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून 8 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन विठ्ठल धनवडे (वय 48, रा. निमशिरगाव, ता. शिरोळ) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सपना सुभाष पोवार (वय 36, रा. कामगार चाळ, इचलकरंजी) यांनी पोलिसात दिली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आठ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संशयित धनवडे याने फिर्यादी आणि त्यांच्या बचत गटातील सहकाऱ्यांना सीएमईजीपी योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. यामुळे फिर्यादी सपना पोवार आणि त्यांच्या बचत गटातील सहकाऱ्यांनी विश्वास ठेवून संशयित धनवडे याला रोखीने व ऑनलाईन पद्धतीने प्रोसेसिंग फी म्हणून वेळोवेळी 7.98 लाख रुपये दिले. मात्र, धनवडे याने कोणतेही कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक केली.
फसवणूक झालेल्यांमध्ये सपना पोवार यांच्यासह सुनिता जाधव, शालन हजारे, चैत्राली मगदूम, अनिता हांजी, महादेवी पाटील, स्वाती मोहिते, मनिषा पारळे, नंदिनी पारळे, बजरंग लोकरे आणि प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे. 15 जुलै 2024 पासून 18 जानेवारी 2025 या कालावधीत घडलेल्या या प्रकरणात महिलांच्या मेहनतीची रक्कम हडप करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून धनवडे याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Previous Articleस्वच्छतेसाठी जिल्हापरिषदेचे कर्मचारी सरसावले
Next Article जगबुडी पुलाची ओळख कायमची पुसणार !








