सांगली :
जादा परताव्याचे अमिष दाखवून तसेच शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे डबल करून देतो अशा भुलथापा लावून फसवणूक करणाऱ्या तिघांविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक एक कोटी 47 लाख, 87 हजार रूपयांची आहे. या प्रकरणी संशयित म्हणून आशुतोष प्रकाश कासेकर रा. राधा रेजिन्सी रामदेव पार्क, मीरा रोड मुंबई पूर्व, पूनम भीमराव भोसले उर्फ जाधव रा. चेतना पेट्रोलपंपानजीक 100 फुटी रोड सांगली, आणि कुणाल सुरेश मिस्त्री रा. मंगळवार पेठ शिवाजी पुलाजवळ कोल्हापूर याचा समावेश आहे. त्यांच्याविरूध्द अनिल बाबूराव पाटील रा. डेक्कन रेसिडेन्सी, सावरकर कॉलनी सांगली यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या नातेवाईक असणाऱ्या शोभा यांना जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यातून तिला थोडा फार परतावा मिळवूनही दिला. त्यानंतर या तिघांनी एकत्रित बैठक घेवून ते फिर्यादी अनिल पाटील यांना भेटण्यास आले. ते भेटण्यास आल्यानंतर त्यांनी शोभा यांना जादा पैसे कसे मिळवून दिले आहेत. याची माहिती दिली. तसेच तुम्हीही या योजनेत पैसे भरा तुम्हाला यापेक्षाही जादा परतावा मिळवून देतो. तसेच तुमचे पैसे दुप्पट होतील असे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी अनिल पाटील आणि त्यांच्या नातेवाईक असणाऱ्या शोभा जैनावर हे बळी पडले आणि त्यांनी त्यांच्याकडे एक कोटी 47 लाख 87 हजार 500 रूपये गुंतविले. त्यानंतर संशयितांनी त्यांना 15 लाख आणि त्यातून मिळालेला फायदा 19 लाख अशी रक्कम परत दिली पण मुळ रक्कम त्यांना दिली नाही.
2021 पासून ही रक्कम त्यांच्याकडे आहे पण या रक्कमेबाबत त्यांनी देण्याबाबत हालचाल केली नाही त्यामुळे अनिल पाटील आणि शोभा जैनावर यांनी मिळून या तिघांच्याविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी याचा तपास सुरू केला आहे.








