सातारा :
अमेरिकन कंपनीत टेडिंग गुंतवणूक करा, महिन्याला 5 ते 10 टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून तब्बल 39 जणांनी 19 जणांची सुमारे 1 कोटी 31 लाख 49 हजार 923 रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भातील गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या 39 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यातील संशयित आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, निशा प्रशांत इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 5 जुलै 2022 पासून जोसेफ अॅन्टनी मॉर्टिनेझ जे. आर., सॅव्हियो विल्यम परेरा, रमेश चौधरी, रणवीर भानुप्रताप सिंग, प्रियांका खन्ना, नैना भाटी, प्रेमकुमार शर्मा, मंगेश बाळासो शिंदे, उमंग गोग्री, हर्ष बन्सल, प्रिस्टन परेरा, सतीश भिमसेन दुबे, राज गाडा, राज संगोरे, निलेश सुधाकर डावखरे, सागर गधट, विजय आनंदा पोसुगडे, तुषार आनंदा पोसुगडे, विक्रातं पद्माकर कदम, सविता विजय पवार, अमोल शिवाजी शिंदे, रमजान महमूद सय्यद, अन्सार खुदबुद्दीन मुल्ला, सचिन पद्माकर पवार, संकेत प्रकाश केसरकर, मयुर हणमंत गुजरे, आरिफ एस. पटेल, अंकुश लक्ष्मण माने, आरिफ मुबारक मुल्ला, पंकज धुमाळ, विकास पाटील, शुभम साबळे, सागर सावंत, विजय शिंदे, मुनाफ सलिम, अमित देशमुख, हौसेराव नलवडे (सर्व रा. माहिती नाही), सरोज राहुल धोंगडी, राहुल प्रभाकर धोंगडी (दोघे रा. हडपसर पुणे) यांनी निशा यांना टीपी ग्लोबल एफ एक्स व आय एक्स ग्लोबल कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भात माहिती दिली. आय.एक्स. ग्लोबल एल.एल. सी. ही अमेरिकन कंपनी असून यांचे मुंबई येथे आय.एक्स. अॅकॅडमी प्रा. लि. हे सध्या बदललेले नाव पोचेन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. रजिस्टर ऑफिस आहे. त्यांच्या कंपनीखाली टी.पी. ग्लोबल एफ. एक्स हा फोरेक्स ट्रेडिंग ब्रोकर आहे. ही कंपनी फॉरेक्स ट्रेडिंगचे ऑटोमेशन सर्व्हिसमध्ये आपण दिलेले पैसे गुंतवते. आपल्या गुंतवलेल्या पैशावर प्रत्येक महिन्याला 5 ते 10 टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून निशा इनामदार यांना 42 लाख 13 हजार 889 रुपये गुंतवण्यास लावून त्याकरवी 7 लाख 25 हजार 878 रुपयांचा फायदा दिला. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच निशा यांची मैत्रिण व इतर 19 जणांचे 34 लाख 88 हजार 111 रुपयांची अशी एकूण 1 कोटी 31 लाख 49 हजार 923 रुपयांची फसवणूक केली आहे. याचा तपास हवालदार डमकले करत आहेत.








