कोल्हापूर :
फॉरेक्स शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन महिन्याला 10 ते 15 टक्के परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची 1 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती पत्नीस करवीर पोलीसांनी अटक केली. सागर मारुती माने (वय 40 रा. जिवबा नाना जाधव पार्क), स्नेहल सागर माने (वय 35 रा. जिवबा नाना जाधव पार्क) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयीत स्नेहल माने व सागर माने यांनी जिवबा नाना जाधव पार्क येथे सादगी सेल्स अॅड सर्व्हिस इन्वेस्टमेंट फर्म नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे अमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर जाहिरात करुन गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. ही जाहिरात आणी ओळखीच्या माध्यमातून फिर्यादी सुनिल मनोहर आंबेकर यांनी माने दांम्पत्याकडे 29 लाख रुपये गुंतविले होते. याचसोबत संपूर्णा बेलेकर, संदेश बेलकर, रविंद्र माळगे, सुलिन मोरे, राहुल भोसले, संजय चव्हाण यांनीही माने यांच्या सादगी सेल्स अँड सर्व्हिस इन्वेस्टमेंट फर्ममध्ये पैसे गुंतविले होते. जानेवारी 2022 पासून 17 जुलै 2023 पर्यंत या सर्वांनी टप्प्याने रक्कम गुंतविली होती. माने यांनी काही काळ गुंतवणूकीवरील परतावा सुरळीत देवू केला. मात्र कालांतराने परतावा देणे बंद केल्यामुळे गुंतवणूकदारांनी माने दांम्पत्याकडे गुंतविलेल्या रक्कमेसाठी तगादा लावला. मात्र या दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे सर्वच गुंतवणूकदारांनी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या फसवणूकीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करत आहेत.
- यांची झाली फसवणूक
सुनिल आंबेकर 29 लाख 80 हजार रुपये, संपूर्णा बेलेकर 25 लाख 27 हजार रुपये, संदेश बेलेकर 90 हजार रुपये, रविंद्र माळगे, 9 लाख रुपये, सुनिल मोरे 5 लाख 86 हजार, राहुल भोसले 16 लाख 61 हजार रुपये, संजय चव्हाण 13 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
- तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता
सागर माने व त्यांची पत्नी स्नेहल माने यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपये गोळा केले आहेत. सध्या 7 जणांनी पुढे येवून तक्रार दिली आहे. अशा प्रकारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. यामुळे या फसवणूकीची व्याप्ती तसेच फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
- दोघांची मालमत्ता गोठवणार
सागर माने व त्याची पत्नी स्नेहल माने या दोघांवर महाराष्ट्र ठेवदार संरक्षण कायद्या अंतर्गतही कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविला आहे. यानंतर या दोघांचीही मालमत्ता गोठवण्यात येणार आहे.








