सुभाषनगर येथील भोंदूबाबावर गुन्हा, अंगावरील कपडे घेऊन दिला अंगारा
प्रतिनिधी/मिरज
घरावरील साडेसाती दूर करण्यासाठी घरातील सदस्यांची घामाने भिजलेली कपडे व इतर साहित्य मागून घेत अंगारा देऊन जादूटोणा करण्याची भिती दाखवून महिलेला 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तासगांव येथील लाँड्री व्यवसायिक श्रीप्रसाद रविंद्र राक्षे (वय 35) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून, सुभाषनगर येथील सलीम मुल्ला (वय 60) या भोंदूबाबावर जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, तासगांव येथील माळी गल्ली भागात श्रीप्रसाद राक्षे राहण्यास असून, त्यांची पत्नी सौ. अस्मिता श्रीप्रसाद राक्षे या शाहू कॉर्नर, मोती तालिमजवळ हातकणंगले येथे वास्तव्य करीत आहेत. मार्च 2022 पासून राक्षे यांचा सुभाषनगर येथील भोंदूबाबा सलीम मुल्ला याच्याशी संपर्क आला. मुल्ला याने अस्मिता राक्षे यांचा विश्वास संपादन करुन तुमच्या घरावरील साडेसाती दूर करतो, अशी थाप मारली होती.
राक्षे या सदर भोंदूबाबाच्या अधिक संपर्कात आल्यानंतर त्याने राक्षे यांचे पती, मुलांसह घरातील सर्व सदस्यांचे फोटो, घामाने भिजलेली कपडे, बॉक्स, रुमाल वगैरे साहित्य मागून घेतले. त्यानंतर सौ. राक्षे यांना अंगारा देऊन त्यांच्या कुटुंबावर जादूटोणा करण्याची धमकी देत जीवीतास धोका निर्माण होईल, असे अघोरी कृत्य केले. या अंधश्रध्देपोटी सदर भोंदूबाबाने सौ. अस्मिता राक्षे यांच्याकडून 50 हजार रुपये उकळले.
सदर भोंदूबाबाकडून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर सौ. राक्षे यांचे पती श्रीप्रसाद राक्षे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गांधी चौकी पोलिसांनी सुभाषनगर येथे राहणारा संशयीत भोंदूबाबा सलीम मुल्ला याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्याची समुळ उच्चाटन करणे अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.