कोल्हापूर :
रिअल इस्टेट कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीवर महिना दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने डॉक्टर दांम्पत्यासह पाच जणांची 98 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 28 सप्टेंबर 2021 ते 8 मार्च 2023 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. याबाबतची फिर्याद मनोज सुनिल गायकवाड (38 रा. जमादार टॉवर्स,शाहू सर्कल) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
यानुसार वैभव वामन जोशी, तेजस शामराव जोशी, आकाश शरद एकल, वंदनार वामन जोशी, स्वाती वैभव जोशी, रुपेश दत्ता गायकवाड (रा. लाईफमार्क रिअल इस्टेट अँड प्रा. लि कंपनी, नेचर हिल अॅग्रो प्रा. लिमीटेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 28 सप्टेंबर 2021 रोजी वैभव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाईफमार्क रिअर इस्टेट अँड डेव्हलपर्स नावाची कंपनी स्थापन केली. बेलबाग येथील ओंकार अपार्टमेंटमध्ये कंपनीचे कार्यालय सुरु केले. यानंतर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला 10 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखविणाऱ्या जाहिराती दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी मनोज गायकवाड यांनी या कंपनीमध्ये 41 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. तसेच पत्नी डॉ. अमृता गायकवाड यांनीही 15 लाख 70 हजार रुपयांची गुंतवणूक केली. चुलत भाउ प्रथमेश गायकवाड यांनी 15 लाख 29 हजार रुपये तर प्रतिक गायकवाड यांनी 7 लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचसोबत गायकवाड यांचे मित्र श्रीपाद साळोखे यांनी 19 लाख 47 हजार रुपये असे एकूण 98 लाख 96 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर काही दिवस कंपनीच्या वतीने परतावा देण्यात आला. मात्र काही महिन्यानंतर परतावा येणे बंद झाला. गायकवाड यांनी याबाबत दोन ते तीन वर्षे वारंवार पाठपुरावा करुनही कंपनीच्या वतीने परतावा देण्यात आला नाही. यामुळे गायकवाड यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.
- फसवणूक झालेली रक्कम
मनोज गायकवाड – 41 लाख 50 हजार
अमृता गायकवाड – 15 लाख 70 हजार
प्रथमेश गायकवाड – 15 लाख 29 हजार
प्रतिक गायकवाड – 7 लाख रुपये
श्रीपाद साळोखे – 19 लाख 47 हजार
एकूण 98 लाख 96 हजार
- रोख व ऑनलाईन स्वरुपात केले पेमेंट
दहा टक्के परताव्याच्या आमिषाने पाच जणांची 98 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या पाचही जणांनी कंपनीमध्ये पैसे गुंतविताना ते रोख आणि ऑनलाईन पद्धतीने जमा केले आहे. काही रक्कम रोख स्वरुपात तर काही रक्कम गुगल पे द्वारे देण्यात आली आहे.








