चिपळूण :
खरेदीच्या व्यवहारातून दोन भावांनी एकाची तब्बल 14.82 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यातील चिंचघरी येथे घडला. मिळकतीचा व्यवहार पूर्ण होत नसल्याने दिलेली रक्कम पुन्हा मागितली असता ती न देता या उलट त्या भावांनी व्यवहार करणाऱ्यास धमकी दिली. याशिवाय व्यवहार केलेली मिळकत ही परस्पर अन्य व्यक्तीला मोठ्या रकमेला विकली. या फसवणूक प्रकरणी त्या दोघा भावांवर मंगळवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज रजनीकांत खेडेकर, प्रितम रजनीकांत खेडेकर (दोघे–चिंचघरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद विजय वसंत पाथरवट (34, चिंचघरी) यांनी दिली. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर 2022 रोजी पंकज खेडेकर याची गट नं 451ची जमीन व ग्रामपंचायत घर नं 640 ही मिळकत खरेदी करण्यासाठी एकूण 14 लाख 82 हजार 300 रुपये इतकी रक्कम विजय पाथरवट यांनी त्याला रोख तसेच धनादेश व फोन पे व्दारे दिली होती. त्या बाबत त्याचा भाऊ प्रितम खेडेकर यालाही पूर्वकल्पना होती. असे असताना पंकज खेडेकर याने विजय पाथरवट यांच्याशी करार केलेला असतानाही शिवाय त्यांची व्यवहार करण्याची तयारी असतानाही त्या मिळकतीबाबत ठरल्याप्रमाणे पुढे कोणताही व्यवहार करण्यात आला. असे असताना व्यवहार करणार नसाल तर 14 लाख 82 हजार 300 रुपयांची रक्कम परत द्यावी, असे विजय पाथरवट यांनी पंकज व प्रितम यांना सांगितले असता ती रक्कम अद्याप न देता उलट त्यानी पाथरवट यांना धमकी दिली. याबरोबरच पंकजने पाथरवट याच्याकडून मिळकतीच्या व्यवहारापोटी पैसे घेतलेले असतानाही त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच त्यांची संमत्ती न घेता ती मिळकत परस्पर अन्य व्यक्तीला मोठ्या रक्कमेस विक्री केली. यातूनच विजय पाथरवट यांची 14 लाख 82 हजार 300 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.








