एपीके फाईल पाठवून बँक खाते लुटण्याचा प्रकार उघडकीस
प्रतिनिधी/ बेळगाव
एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड भरण्यासाठी त्याला पोलीस दलाकडून चलन पाठविण्यात येते. ई-चलनच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. राजधानी बेंगळूरसह बेळगाव, शिमोगा आदी जिल्ह्यांत अशा घटना वाढीस लागल्या आहेत.
एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलधारकांचे बँक खाते व इतर माहिती मिळवून लाखो रुपये त्यांच्या खात्यातून पळविण्याचे प्रकार जुनेच आहेत. यासाठी सरकारी खात्यांच्या नावाचा वापर केला जातो. आता पोलीस दलाकडून दंड भरण्यासाठी येणाऱ्या ई-चलनच्या आडून एपीके फाईल्स पाठवून बँक खात्यातील रक्कम पळविण्यात येत आहे.
बेळगावातही असे अनेक प्रकार घडले आहेत. सायबर गुन्हेगारांनी ई-चलनच्या नावाने एपीके फाईल पाठवून वाहन चालविताना नियम मोडल्यासंबंधी ऑनलाईन दंड भरू शकता, असे सांगत लूट सुरू केली आहे. सायबर क्राईम विभागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जातो.
बेळगावबरोबरच शिमोगा जिल्ह्यातही अशा घटना घडल्या आहेत. शिमोगा येथील एका रहिवाशाला ऑनलाईन फाईन भरा, अशी एक फाईल व्हॉट्सअॅपवर आली. त्यांनी फाईलवर क्लिक केले. आपल्या वाहनावर नेमका कितीचा दंड आहे? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मोबाईलवर अॅप्लिकेशनही डाऊनलोड करून घेतले. आपल्या वाहनाचा क्रमांक नोंदवून दंड किती आहे? हे तपासण्याचा प्रयत्न केला.
अॅपवर कसलीच माहिती त्यांना मिळाली नाही. त्यांच्या दोन बँक खात्यातून दीड लाख रुपये थोड्यावेळात भामट्यांनी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बेळगाव येथील एका वाहनचालकाला दंड भरण्यासाठी आलेल्या एपीके फाईलवर क्लिक केल्यामुळे त्याच्या खात्यातून 40 हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे. सायबर क्राईम विभागाला एपीके फाईलची डोकेदुखी वाढली असून आता तर ई-चलनच्या नावे सुरू असलेल्या फसवणुकीमुळे अधिकारीही चक्रावले आहेत.









