वृत्तसंस्था/ क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या फिफाच्या 2023 च्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्रिस्बेनच्या सनकॉर्फ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा 2-1 असा पराभव करत तीन गुण वसूल केले.
या सामन्यात फ्रान्सतर्फे युगेनी लि सोमेर आणि वेनडी रिनार्ड यांनी प्रत्येकी एक गोला केला. फ गटातील झालेल्या या सामन्यात फ्रान्सला या विजयामुळे तीन गुण मिळाले असून आता ते या गटात आघाडीवर आहेत. फ्रान्सने आतापर्यंत 4 गुण मिळवले आहेत. फ गटामध्ये जमैका व पनामा यांचा समावेश आहे. ब्राझीलचा संघ या गटात 3 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.
फ्रान्स अणि ब्राझील यांच्यातील या सामन्यात पहिल्या 17 मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर ब्राझीलवर दडपण राखले होते. 18 व्या मिनिटाला युगेनी सोमेरने फ्रान्सचे खाते हेडरद्वारे मारलेल्या गोलवर उघडले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत फ्रान्सने ब्राझीलवर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर पाचच मिनिटात ब्राझीलने फ्रान्सशी बरोबरी साधली. ब्राझीलचा हा एकमेव गोल ख्रिस्टेनी डी ओलिविराने केला. 82 मिनिटापर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. 83 व्या मिनिटाला फ्रान्सला कॉर्नर किक मिळाली आणि त्यांच्या रेनार्डने शानदार गोल नोंदवून ब्राझीलचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या गट गटातील सामन्यात स्वीडनने इटलीचे आव्हान 5-0 असे संपुष्टात आणले होते.









