दोन गोल्सनी पराभूत झालेल्या मोरोक्कोचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ अल खोर, कतार
विद्यमान विजेत्या फ्रान्सने मोरोक्कोचे आव्हान 2-0 अशा गोलफरकाने संपुष्टात आणत विश्वचषक स्पर्धेची सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठली. रविवारी जेतेपदासाठी अर्जेन्टिनाविरुद्ध त्यांची लढत होईल तर क्रोएशिया व मोरोक्को यांच्यात शनिवारी तिसऱया स्थानासाठी लढत होईल. फुटबॉलमधील नवा सुपरस्टार एम्बापे व अर्जेन्टिनाचा लिजेंड लायोनेल मेस्सी यांच्यातील जुगलबंदी पाहण्याची अपेक्षा चाहत्यांनी केली होती, ती आता रविवारी पूर्ण होणार आहे. एम्बापेने मागील वेळेस जेतेपद पटकावण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे यावेळी मेस्सीला हा आनंद लुटण्याची संधी मिळावी, असेच जगभरातील चाहत्यांना वाटत आहे.
मोरोक्कोने चमकदार प्रदर्शन करीत या स्पर्धेची बाद फेरी गाठून सर्वांनाच चकित करीत इतिहास निर्माण केला होता. बाद फेरीतील दोन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम करीत त्यांनी अशी कामगिरी करणारा आफ्रिका व अरबचा पहिला संघ होण्याचा मान मिळविला. मात्र उपांत्य फेरीत फ्रान्सने त्यांची घोडदौड रोखण्यात यश मिळविले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत फ्रान्सने आफ्रिकेचा पहिला सेमिफायनलिस्ट मोरोक्कोवर मात केली. पाचव्या मिनिटाला थिओ हर्नांडेझने पहिला तर बदली खेळाडू रँडाल कोलो मुआनीने 79 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. या दोन्ही गोलसाठी एम्बापेने ‘पाय’भार लावला होता. 2018 मध्ये रशियात झालेल्या स्पर्धेत एम्बापेने शानदार प्रदर्शन करीत युवकांचा आयकॉन बनला असून ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांच्या सलग दोन स्पर्धा जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी त्याला मिळाली आहे. 35 वर्षीय मेस्सी व पोर्तुगालचा रोनाल्डो यांनी गेली 15 वर्षे फुटबॉल जगतावर वर्चस्व गाजविले असून रविवारी नवा स्टार एम्बापे व मेस्सी यांच्यात कोण सरस ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1962 मध्ये ब्राझीलने जेतेपद स्वतःकडेच राखणारा पहिला संघ होण्याचा मान मिळविला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी फ्रान्सला मिळाली आहे. अनेकांसाठी ही स्वप्नवत अंतिम लढत ठरणार आहे. अर्जेन्टिनाने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली असून तिसऱयांदा ही स्पर्धा अर्जेन्टिनाला जिंकून देण्याची जबाबदारी मेस्सीने स्वीकारली आहे. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मेस्सीनेही आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. ‘आम्हाला सर्व ताकद, सर्व शक्ती पणाला लावून या लढतीत खेळावे लागेल. कारण बलाढय़ प्रतिस्पर्धी संघात मेस्सीच्या रूपात या खेळातील एक लिजेंड खेळत आहे,’ असे मत फ्रान्सचा गोलरक्षक हय़ुगो लॉरिस म्हणाला.
मोरोक्कोची अभिनंदनीय घोडदौड
मिडल ईस्टमध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेत अरबचा एकही संघ अंतिम फेरी गाठणार नाही, असे मानले जात होते. पण मोरोक्कोने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत त्यांची ही इच्छा अंशतः पूर्ण केली आहे. या संघाने आफ्रिकन देशांचा अभिमान वाढविला तर क्रोएशिया, बेल्जियम यासारख्या बलाढय़ संघांचा समावेश असलेल्या गटात त्यांनी अव्वल स्थान मिळविले आणि बाद फेरीत स्पेन व पोर्तुगाल या दोन युरोपमधील बलाढय़ संघांना धक्का दिल्यानंतर अरब देशांनाही त्याचे अप्रूप वाटले. उपांत्य फेरीतही त्यांनी फ्रान्सला चांगली टक्कर दिली. पण सामना संपल्याची शिटी वाजल्यानंतर या संघातील खेळाडू निराशेने जमिनीवर कोसळले.

हर्नांडेझने नोंदवलेला पहिला गोल हा मोरोक्कोविरुद्ध या स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूने नोंदवलेला पहिला गोल होता. साखळी फेरीत त्यांनी स्वयंगोल करून प्रतिस्पर्ध्याला गोल बहाल केला होता. असे असले तरी मोरोक्कोने या सामन्यात धडाकेबाज खेळ करीत अल बायत स्टेडियमवर जमलेल्या हजारो शौकिनांना खुश केले. काही वेळा त्यांनी फ्रान्सला डिफेंड करण्यास भाग पाडले होते. पण सर्वोत्तम खेळ न करताही विजय मिळविण्याची कला फ्रान्सने चांगल्या प्रकारे अवगत केली आहे. गेल्या सात विश्वचषकात फ्रान्सने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली असून अन्य एकाही संघाला हा पराक्रम करणे जमलेले नाही.
एम्बापेने आतापर्यंत पाच गोल केले आहेत, पण या सामन्यात त्याला त्यात भर टाकता आली नाही. मात्र पहिल्या गोलसाठी त्याने संधी निर्माण करून दिली. त्याने मारलेला चेंडू एका डिफेंडरकडून डिफ्लेक्ट झाल्यानंतर लेफ्टबॅक हर्नांडेझच्या मार्गात पडला. त्याने चेंडू बाऊन्स झाल्यानंतर जोरदार ड्राईव्ह करीत चेंडू जाळय़ात मारला. 44 व्या मिनिटाला मोरोक्कोला गोलची संधी मिळाली होती. पण ती फ्रान्सच्या भक्कम बचावफळीने फोल ठरविली. मोरोक्कोला या सामन्यात जखमी खेळाडूंचाही फटका बसला. उत्तरार्धात 79 व्या मिनिटाला एम्बापेने दोन डिफेंडरना मागे टाकत मारलेला फटका कोलो मुआनीला मिळाला, त्याने त्याला टॅप करीत चेंडू जाळय़ात धाडला.
गोल्डन बूटसाठी मेस्सी व एम्बापे यांच्यात चुरस असून दोघांचे प्रत्येकी 5 गोल झाले आहेत.









