वृत्तसंस्था/ पॅरिस
2030 साली होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद फ्रान्सला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या स्पर्धेच्या यजमानपदासाठी काही अटी राहतील. बुधवारी झालेल्या आयओसीच्या बैठकीमध्ये 2030 सालातील हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा सुरळीत आणि मोठ्या प्रमाणात यशस्वी केली जाईल, याची ग्वाही फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिली आहे.
2024 ची उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा येथे शुक्रवारपासून सुरू होणार असून संपूर्ण पॅरिस शहर एका नववधू प्रमाणे नटले आहे. आयओसीने 2030 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या अटी फ्रान्सने मान्य केल्यानंतर आयओसीच्या सदस्यांनी या स्पर्धेच्या यजमानपदासाठी मतदान केले आणि या बैठकीत फ्रान्सला या आगामी स्पर्धेचे यजमान म्हणून घोषित केले. 2030 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेतील काही क्रीडा प्रकार नीस शहरामध्ये होणार आहे.
2034 साली होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी सॉल्ट लेक सिटीची निवड करण्यात आली आहे. आयओसीच्या या बैठकीमध्ये सॉल्ट लेक सिटीला पुन्हा ऑलिंपिक स्पर्धा भरविण्याची संधी मिळविणार आहे. 2034 च्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी अमेरिकेनेही तयारी दर्शविली आहे. पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा 2002 साली सॉल्ट लेक सिटीमध्ये भरविण्यात आली होती. त्यानंतर आता या शहराला 32 वर्षानंतर दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळविणार आहे.









