मोरोक्कोला प्रभाव पाडण्यात अपयश
वृत्तसंस्था/ अॅडलेड (ऑस्ट्रेलिया)
युजेनी ले सोमरने दोन गोलांच्या माध्यमातून चमकदार कामगिरी करत मंगळवारी महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सला मोरोक्कोवर 4-0 असा सहज विजय मिळवून दिला आणि सहयजमान ऑस्ट्रेलियाशी उपांत्यपूर्व फेरीत गांठ पक्की केली.
बाद फेरीसाठीच्या शर्यतीत जर्मनीला मागे टाकून त्यांना धक्का देऊनही आणि स्पर्धेत पदार्पणातच प्रभावी कामगिरी करूनही मोरोक्कोला अॅडलेडमध्ये हर्व्ह रेनार्डच्या जबरदस्त फ्रेंच संघाविऊद्ध संघर्ष करावा लागला. सामना सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांत कादिडियाटौ डियानीने गोल करण्यास सुऊवात केली. त्यानंतर केन्झा डाली आणि ले सोमर यांनी भर टाकल्यामुळे पहिल्या सत्राच्या मध्यानंतर त्यांची आघाडी 3-0 पर्यंत वाढली.
अनुभवी आघाडीपटू ले सोमर ही फ्रान्सची सर्वकालीन सर्वाधिक गोल नोंदविणारी खेळाडू असून तिने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या 13 हजार 557 प्रेक्षकांसमोर सामना संपण्यास 20 मिनिटे असताना पुन्हा चेंडू जाळीत सारला आणि फ्रान्स संघ फारशा प्रतिकाराला तोंड द्यावे न लागता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. ते आता शनिवारी ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाशी खेळतील. त्यातील विजेत्या संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंड किंवा कोलंबियाशी सामना होईल.
फ्रान्सचा महिला संघ पहिले मोठे आंतरराष्ट्रीय जेतेपद जिंकण्यासाठी आतुर असून दुसऱ्या बाजूने मोरोक्कोच्या संघावर मैदानात उतरताना फारसा दबाव नव्हता. कारण त्यांना विश्वचषकात आधीच मोठे यश मिळाले आहे. त्यांचे प्रशिक्षक असलेले माजी फ्रेंच आंतरराष्ट्रीय मिडफिल्डर रेनाल्ड पेड्रोस यांनी मागील सामन्यात खेळलेल्या संघात बदल न करणे पसंत केले. मागील सामन्यात कोलंबियावर 1-0 ने विजय मिळवून त्यांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते.
दुसरीकडे, रेनार्डने मात्र पनामाचा 6-3 असा पराभव करणाऱ्या फ्रान्स संघात पाच बदल केले. त्यात बचाव फळीतील खेळाडू सकीना कारचौईला परत खेळविण्याचाही समावेश राहिला. कारचौईचे आई-वडील मोरोक्कन आहेत. तिने डाव्या बगलेतून चांगली धाव घेऊन सेल्मा बाचासोबत चेंडूची झटपट देवाणघेवाण केली आणि नंतर डियानीला गोल नोंदविण्याची संधी उपलब्ध करणारा क्रॉस पुरविला. डियानीचा हा स्पर्धेतील चौथा गोल आहे. अंतिम गट सामन्यात तिने पनामाविऊद्ध हॅट्ट्रिकची नोंद केली होती.
दुसरा गोल 20 व्या मिनिटाला झाला. यावेळी डियानीने परत चेंडू डॅलीला पुरविला आणि तिने दूरवरून फटका हाणत गोलाची नोंद केली. त्यानंतर तीन मिनिटांनी बचावात झालेली एक चूक मोरोक्कोला महागात पडून फ्रान्सने 3-0 अशी आघाडी वाढवली. यावेळी नेसरिन अल चाडने चेंडू दूर फटकावण्याचा प्रयत्न केला असता तो डियानीकडे पोहोचला आणि तिने ले सोमरला चेंडू पुरवून गोल नोंदविण्याच्या कामी मदत केली.
यावेळी मोरोक्कोला त्यांच्या पहिल्या सामन्यात जर्मनीने 6-0 अशा फरकाने जो धुव्वा उडविला होता त्याच्यापेक्षा भारी पराभव स्वीकारावा लागतो की काय अशी भीती वाटली असेल. मात्र त्यानंतर फ्रान्सच्या आक्रमणाची धार कमी झाली आणि आणखी एकच गोल त्यांना करता आला. 70 व्या मिनिटाला बदली खेळाडू विकी बेकोने दिलेल्या क्रॉसवर ले सोमरने आपला 92 वा आंतरराष्ट्रीय गोल केला. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या संघांत स्पेन, नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, कोलंबिया यांचा समावेश आहे.









