प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीने 2018 मध्ये महामेळावा आयोजित केला होता. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्याची सुनावणी चौथे जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू असून त्याठिकाणी शनिवारी फ्रेम चार्ज झाले आहे. आता पुढील तारखेपासून खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
कर्नाटक सरकारने सुवर्णसौधमध्ये अधिवेशन आयोजित केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. पोलीस व जिल्हा प्रशासनाने या मेळाव्याला परवानगी दिली नाही. तरीदेखील मेळावा भरविला म्हणून म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, निंगोजी हुद्दार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. म. ए. समिती नेत्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. विष्णू जाजरी हे काम पाहात आहेत.









