नागरिकांमध्ये भीती, वनखात्याला डोकेदुखी : वन्यप्राण्यांना रोखण्याचे आव्हान
बेळगाव : शहर परिसरात कोल्ह्यांचा वावर वाढल्याने वनखात्याची डोकेदुखी वाढली आहे. मागील आठवड्यात शास्त्राrनगर परिसरात कोल्हा आढळून आला होता. त्यापाठोपाठ रविवारी पुन्हा शिवाजीनगर परिसरात कोल्ह्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. विशेषत: मानवी वस्तीत कोल्ह्यांचा वावर वाढल्याने वन्यप्राण्यांविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अलीकडेच शहरात बिबट्या, तरस, हरिण, कोल्हा आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढताना दिसत आहे. गतवर्षी रेसकोर्स परिसरात बिबट्याने तब्बल महिनाभर तळ ठोकला होता. त्यामुळे शहरवासियांची झोप उडाली होती. अखेर बिबट्या सहीसलामत निसटून गेला होता. त्यानंतर आता शहरात कोल्ह्यांची दहशत वाढली आहे. शास्त्रीनगर पाठोपाठ आता शिवाजीनगर परिसरात रविवारी रात्री कोल्हा आढळून आला. सातत्याने वन्यप्राणी भरवस्तीत येत असल्याने त्यांच्या अधिवासाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कोल्ह्यांची रवानगी भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात
शास्त्रीनगर व शिवाजीनगर येथे सापडलेल्या कोल्ह्यांची रवानगी भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे. दरम्यान त्यांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. अलीकडच्या काही वर्षांत वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे सहाजिकच वन्यप्राण्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शहरापासून जवळ असलेल्या गोल्याळी, कणपुंबी, जांबेटी परिसरात वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, गवे, कोल्हे, तरस, रानडुक्कर, साळींद्र आदींची संख्या वाढली आहे. वन्यप्रदेशात मानवाने विकासकामे वाढविली आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव वन्यप्राणी सैरभैर होऊन मानवी वस्तीत येत आहेत. अशा भावना वन्यप्राणीप्रेमींतून व्यक्त होत आहेत. गतवर्षी शहरातील रेसकोर्स परिसरात बिबट्या, देसूर गावात गवीरेडे, येळ्ळूर येथे हरिण, बसवनकुडची व बाळेकुंद्री परिसरात तरस आढळून आले होते. त्यापाठोपाठ आता शास्त्राrनगर व शिवाजीनगर परिसरात कोल्हे आढळून आले आहेत. त्यामुळे वर्षभरात मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी वन्यप्राण्यांना रोखण्याचे नवे आव्हान वनखात्यासमोर आहे.
कोल्हे सैरभैर की पिसाळलेले आहेत?
शास्त्राrनगर येथे कोल्ह्याने एकाचा चावा घेतला होता. तर शिवाजीनगर येथील कोल्ह्याने धरपकडीवेळी तिघांचा चावा घेतला आहे. त्यामुळे हे कोल्हे सैरभैर होऊन मानवी वस्तीत आलेत की, पिसाळलेले आहेत? याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही.
बेळगाव परिसरातील वनक्षेत्रात वाढ- शिवरुद्रप्पा कबाडगी (एसीएफ, वनखाते)
अलीकडे बेळगाव परिसरातील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. दरवर्षी लाखोने वृक्ष लागवड होऊ लागली आहे. त्यामुळे वनक्षेत्रात भर पडली असून वन्यप्राण्यांचे संवर्धन होत आहे. शिवाय वन्यप्राण्यांची संख्याही वाढू लागली आहे. सैरभैर होऊन वन्यप्राणी शहरात येऊ शकतात.









