नवी दिल्ली :
इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीने तामिळनाडूमध्ये आपला नवा कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनी 1600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मोबाईल उपकरणांची निर्मिती करणार असल्याची माहिती आहे. या नव्या इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या निर्मितीच्या कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर 6000 जणांना नोकऱ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. तामिळनाडू राज्याचे उद्योग मंत्री डॉ. टी. आर. बी. राजा यांनी सदरची माहिती दिली आहे.
चेन्नईजवळील कांचीपूरमनजीक फॉक्सकॉनचा नवा कारखाना अस्तित्वात येणार आहे. फॉक्सकॉन तामिळनाडूत अॅपलच्या आयफोनच्या असेंबलीचे कार्यही करत आली आहे. या प्लांटअंतर्गत 35,000 पेक्षा अधिक जणांना कंपनीकडून रोजगार प्राप्त झाला आहे. मोबाईलच्या सुट्या भागांचा हा नवा कारखाना 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नव्या कारखान्यासाठी गुंतवणूकीसाठी तामिळनाडूचीच निवड कंपनीने दुसऱ्यांदा केली आहे.









