वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणारी फॉक्सकॉनची उपकंपनी, तामिळनाडूमध्ये 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे सीईओ ब्रँड चेंग आणि कंपनीच्या इतर प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या बैठकीत राज्यातील गुंतवणुकीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट राज्यात 180 दशलक्ष ते 200 दशलक्ष डॉलर्स गुंतवण्याची योजना बनवत असल्याचे म्हटले आहे. तैवान येथील फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट कंपनी 2024 पर्यंत प्लांट पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित करुन काम करत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणखी गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र, तामिळनाडूतील या गुंतवणुकीबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. कंपनी मोबाइल नेटवर्क आणि क्लाउड संगणकीय उपकरणे बनवते.
फॉक्सकॉनचे चेन्नईजवळ अगोदरच मोठे जाळे
फॉक्सकॉनचे चेन्नईत जाळे पसरले आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याने सांगितले की ते फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेटसोबत चर्चा करत आहेत, ज्यांनी नवीन प्लांटसाठी 1.07 अब्ज गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.
फॉक्सकॉन आणि गुजरात करार
फॉक्सकॉनची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात या गृहराज्याशीही चर्चा सुरू आहे. कारण कंपनी भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रवेश करू इच्छित आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये एका परिषदेचे उद्घाटन करतील, ज्यामध्ये फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ देखील उपस्थित राहणार आहेत. 2021 मध्ये, त्यांच्या सरकारने देशांतर्गत चिप उत्पादनासाठी 10 अब्ज डॉलरची योजना जाहीर केली, ज्यामध्ये फॉक्सकॉन आणि स्थानिक समूह वेदांता लिमिटेड या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले, परंतु कोणताही प्रस्ताव प्रत्यक्षात मात्र आला नाही.









