‘भारताला क्रूझ पर्यटनाचे केंद्र बनविण्यावर होणार चर्चा
पणजी : जी20 कृतीगटाची पर्यटन मंत्रीस्तरीय समारोपाची बैठक आज दि. 19 पासून गोव्यात प्रारंभ होत आहे. क्रूझ टुरिझम, ग्लोबल टुरिझम, प्लॅस्टिक इनिशिएटिव्ह आणि सार्वजनिक खाजगी क्षेत्रांच्या महत्त्वाच्या उपक्रमांसंदर्भात या बैठकीत चर्चा, परिसंवाद होणार आहेत. जी20 सदस्य देश, केंद्रीय मंत्रालये, आंतरराष्ट्रीय संघटना आणि विविध राज्य सरकारे यांचा त्यात सहभाग आहे. पत्र सूचना कार्यालयातर्फे काल रविवारी दोनापावला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यांनी ही माहिती दिली. यावेळी जी 20 च्या संचालक राधा कटीयाल, अतिरिक्त पर्यटन सचिव राकेश वर्मा, राज्य नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज व नानू भसिन यांची उपस्थिती होती.
शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गोवा आराखडा आणि जी 20 पर्यटन मंत्र्यांचा जाहीरनामा हे पर्यटन कृतीगटाचे दोन अत्यंत महत्त्वाचे उपक्रम असून दोन्ही उपक्रमांना अंतिम स्वरुप देण्याच्या दिशेने गटाने सकारात्मक प्रगती केली आहे. आजच्या बैठकीत ‘पर्यटन क्षेत्रातील प्लॅस्टिकच्या चक्राकार अर्थव्यवस्थेकडे जागतिक प्लॅस्टिकविषयक पुढाकार’ या विषयावर चर्चा होईल, तर उद्या दि. 20 रोजी होणाऱ्या बैठकीत ‘भारताला क्रूझ पर्यटनाचे केंद्र बनवण्यावर’ लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. दि. 21 रोजी ‘सरकारी खाजगी संवाद: जी-20 अर्थव्यवस्थांसाठी प्रवास आणि पर्यटनाचे महत्त्व’ या विषयावर संवादसत्र होईल. या मंत्रीस्तरीय बैठकीच्या दरम्यान ’आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय सर्व प्रतिनिधींना गोव्यातील पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधीही मिळणार आहे. त्यात जुने गोवेतील युनेस्कोची विविध जागतिक वारसा स्थळे, आग्वाद किल्ला व कारागृह संग्रहालय आदींचा समावेश असेल. समारोप सत्रात स्थानिक हस्तकलेच्या प्रचारासाठी गोव्यातील ’एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत असलेली उत्पादने प्रतिनिधींना स्मृतिचिन्ह म्हणून प्रदान केली जातील.









