वृत्तसंस्था / नेल्सन
यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सोमवारचा चौथा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या मालिकेत न्यूझीलंडने विंडीजवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने न्यूझीलंडचा सात धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर न्यूझीलंडने दुसरा सामना 3 धावांती तर तिसरा सामना 9 धावांनी जिंकून विंडीजवर 2-1 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना सोमवारी ओव्हल मैदानावर खेळविण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 6.3 षटकात 1 बाद 38 धावा जमविल्या असताना अचानक वादळी वाऱ्याला प्रारंभ झाला. पावसाचा संततधार असल्याने मैदान आणि खेळपट्टीवर बरेच पाणी साचले होते. त्यामुळे पंचांनी शेवटी परिस्थितीचा आढावा घेत हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ड्युनेडीन येथे गुरूवारी खेळविला जाईल.









