बडे अधिकारी अडकण्याची शक्यता : या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा सीबीआयचा प्रयत्न
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पदभरतीवेळी झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सलग चौथ्या दिवशीही सुरू होती. सीबीआयच्या दिल्ली व बेंगळूर येथील पथकाकडून रविवारीही सखोल चौकशी करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केल्याने कॅन्टोन्मेंटमधील बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 2021 मध्ये झालेल्या पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. उमेदवारांकडून लाखो रुपयांचा मलिदा गोळा करून पदे भरण्यात आली होती. याची माहिती कॅन्टोन्मेंटमधील काही नागरिकांना समजताच त्यांनी बेंगळूर तसेच दिल्ली येथील सीबीआय तसेच इतर केंद्रीय चौकशी यंत्रणांकडे तक्रार दाखल केली होती. 19 पदांसाठी झालेल्या या भरतीवेळी उमेदवारांकडून प्रत्येक पदासाठी लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंटमधील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने मागील वर्षभरापासून या प्रकरणाची चौकशी स्थानिक स्तरावर सुरू होती. महिनाभरापूर्वी पुणे येथील सदर्न कमांडच्या सदस्यांनीही कॅन्टोन्मेंटला भेट देऊन या प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता दिल्ली व बेंगळूर येथील सीबीआयचे पथक बेळगावमध्ये आले असून त्यांच्याकडून अधिकारी व भरती करण्यात आलेल्या उमेदवारांची चौकशी सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सीबीआयचे पथक बेळगावमध्ये ठाण मांडून असल्याने या प्रकरणाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. कॅन्टोन्मेंटचे सीईओ के. आनंद यांच्यासमवेत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
इतर प्रकरणेही बाहेर पडण्याची शक्यता
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये झालेल्या पदभरती गैरव्यवहाराबरोबरच इतर प्रकरणेही बाहेर पडण्याची शक्यता आहे. अनेक तक्रारदार बाहेर पडू लागल्याने तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनधिकृत बांधकामांना आसरा, परवानगी यासह इतर प्रकरणेही सीबीआयकडे पोहोचू लागली आहेत. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांमधून केली जात आहे.









