भेटनिधी 10 लाख रुपये,सन्मानपत्र देणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : गोव्याच्या मुक्तीलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची दखल घेऊन यंदा स्थानिक तसेच देशाच्या अन्य राज्यांमधील मिळून 15 शूरविरांच्या पहिल्या पिढीतील कुटुंबियांचा 63 व्या मुक्तीदिनी विशेष कार्यक्रमात बहुमान करण्यात येणार आहे. हुतात्म्यांच्या योगदानाची खूण म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना रोख रू. 10 लाख आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. त्यावेळी गृह सचिव मंथन नाईक यांची उपस्थिती होती. मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पर्वरीत विधानसभा संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी या शहिदांच्या योगदानाची खूण म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना रोख रू. 10 लाख आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तब्बल 450 वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांच्या वसाहतवादाखाली घालविल्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी लढताना शौर्य दाखविलेल्या आणि बलिदान दिलेल्या असंख्य स्थानिकांबरोबरच देशाच्या विविध राज्यांमधून आलेल्या सत्यागृहींचाही समावेश होता. यात खास करून पीटर अल्वारीस, आल्फ्रेड आल्फॉन्सो, अँथनी डिसोझा आणि मार्क फर्नांडिस यांचा समावेश होता. त्यांच्या नेतृत्वाखाली तीन तुकड्या तेरेखोल, पत्रादेवी आणि अन्य मार्गांमधून गोव्यात निघाल्या. 15 ऑगस्ट 1954 रोजी पोळे सीमेवर त्या सर्वांना पोर्तुगीजांनी अटक करून तुऊंगात टाकले आणि लष्करी न्यायालयाद्वारे खटला चालवला.
त्यानंतर गोवा विमोचन साहाय्यक समिती या पुण्यातील सत्याग्रही संघटनेने पोर्तुगीजाविऊद्ध लढण्यासाठी देशभरातील तऊणांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार सुमारे 10 हजार नि:शस्त्र सत्याग्रहींनी विविध सीमेवरून गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. 2500 जणांच्या सर्वात मोठ्या तुकडीने पत्रादेवीहून गोव्यात येण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मध्य प्रदेशातील एक तऊण विधवा सहोदरादेवी या तिरंगा फडकवत पत्रादेवी येथे चितळे यांच्या समवेत गटाचे नेतृत्व करत होत्या. त्यावेळी पोर्तुगीज सैनिकांनी तिच्यावर गोळी झाडली. त्यात त्या जखमी झाल्या. कर्नेल सिंग बेनिपाल या तऊणाने पुढे येत नि:शस्त्र महिलांवर हल्ला करण्यापेक्षा गोळ्या घालण्याचे आव्हान पोर्तुगीज सैनिकांना दिले. परंतु पोर्तुगीज सैनिकांनी खरोखरच त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या लढ्यात सुमारे 70 सत्याग्रही मारले गेले. त्यापैकी 30 जणांना पत्रादेवी येथे गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना 15 ऑगस्ट 1955 रोजी घडली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सन्मानित करण्यात येणारे स्वातंत्र्यसैनिक
- बाळा राया मापारी
- कर्नल सिंग बेनिपाल
- बसवराज हुडगी
- शेषनाथ वाडेकर
- तुलशीराम बाळकृष्ण हिरवे
- बाबुराव केशव थोरात
- सखाराम यशवंत शिरोडकर
- रोहिदास मापारी
- यशवंत सखा आगरवाडेकर
- रामचंद्र नेवगी
- बापू विष्णू गावस
- बाबला धोंडो परब
- लक्ष्मण नारायण वेलिंगकर
- केशवभाई सदाशिव टेंगसे
- परशुराम श्रीनिवास आचार्य









